नवी दिल्ली, 29 फेब्रुवारी : दिल्लीत हिंसाचाराने संपूर्ण देश हादरला. दिल्लीतील हिंसाचाराबाबत समोर येणारे व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहत नाही. फैजान या तरूणाचा व्हिडीओ तर हादरवून टाकणारा होता. 23 वर्षीय फैजान आणि इतर तरूणांना पोलिसांच्या वर्दीतील माणसांकडून मारहाण करण्यात आली होती. अशावेळी राष्ट्रगीत म्हणणाऱ्या फैजानचा व्हिडीओ खूप वेगाने देशभरात पसरला होता. रक्ताने माखलेल्या या तरूणांवर अजिबात दया न दाखवता ते त्यांना मारत राहिले. एवढच नाही तर मारताना त्यांनी हे देखील वारंवार विचारलं गेलं की, ‘तुम्हें आजादी (Freedom) चाहिए ना? तो लो आजादी’. हा व्हिडीओ शूट झाल्यानंतर काहीच दिवसात फैजानचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा- Delhi Violence: हिंसाचारात 630 जणांना घेतलं ताब्यात, रात्रभर पोलिसांचा बंदोबस्त ) फैजानच्या जाण्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. न्यूज18 इंडियाची टीम फैजानच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांशी बातचीत केली. त्याच्या जाण्याने फैजानचं कुटुंब पूर्णपणे विखूरलं आहे. फैजानचा भाऊ नईम याने सांगितल्यानूसार, ’23 फेब्रुवारीला जेव्हा CAA च्या विरोधात जेव्हा आंदोलन चालू होतं, त्याठिकाणी फैजान सुद्धा होता. अचानक चारही बाजुंनी अश्रुधुर येण्यास सुरूवात झाली. त्यावेळी काही पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी त्याठिकाणी असणाऱ्या तरूणांना निर्दयीपणे मारण्यास सुरूवात केली. ही मुलं अर्धमेल्या अवस्थेत पोहोचेपर्यंत पोलीस त्यांना मारतच होते.’ नईमने पुढे सांगितलं की, ‘या जखमी मुलांना जीटीबी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं होतं मात्र तिथे त्यांच्यावर योग्य उपचार झाले नाहीत. त्यानंतर त्यांना ज्योतिनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. दोन दिवस तिथेच ठेवण्यात आलं. माझा भाऊ मरत होता आणि पोलिसांनी आम्हाला त्याला भेटूही नाही दिलं. उलट त्यांनी आम्हालाच शिव्या दिल्या आणि धक्के मारत बाहेर हाकलवलं. 25 फेब्रुवारीला पोलिसांनी फोन करून फैजानला घेऊन जाण्यास सांगितलं.’ नईमने पोलिसांवर असे आरोप केले आहेत की, ‘पोलिसांना कल्पना आली होती की फैजान मरणार आहे. मात्र तो पोलीस कोठडीत मरेल असं वाटल्यामुळे त्यांनी आम्हाला बोलावलं.’ (हेही वाचा- कन्हैया कुमारवर चालणार देशद्रोहाचा खटला, केजरीवाल सरकारने दिली मंजुरी) फैजानच्या नात्यातीलच एक बबलूने दिलेल्या माहितीनुसार, ‘फैजानला आणण्यासाठी जेव्हा आम्ही पोलीस ठाण्यात पोहोचलो तेव्हा फैजानच्या तोंडातून आणि डोक्यातून रक्तस्राव होत होता. आमचा फैजान असा नव्हता. संपूर्ण रात्र तो तडफडत होता आणि हेच सांगत होता की पोलिसांनी त्याला खूप मारहाण केली आहे.’ बबलूने माहिती दिली की जेव्हा सकाळी फैजानला जीटीबी रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं. फैजानचा भाऊ नईमने सांगितलं की, ‘ आमच्यासोबत अन्याय झाला आहे. सर्व ठिकाणीच बेपर्वाई झाली आहे. पोलिसांना मारहाण करण्याचा अधिकार कुणी दिला? ते आमच्या सुरक्षेसाठी नाहीत का? नईमने सांगितलं की, ‘ पोलीस वारंवार त्यांना ‘आझादी’वरून डिवचत होते. कशापासून हवं होतं स्वातंत्र्य, हे विचारलं का त्यांना? केवळ मारून मारून जीव घेतला.’ जेव्हा न्यूज18 इंडियाची टीम नईमसोबत बातचीत करत होती, तेव्हा एक पोलीस तिथे आला त्याने काही प्रश्न विचारले, फोटो काढले आणि निघून गेला. फैजानने कुटुंबीय मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.