नवी दिल्ली, 09 जून : भारतात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात सध्या 2 लाख 56 हजार 611 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 7200 जणांचा मृत्यू झाला आहे. यातच देशातील काही राज्यांनी लॉकडाऊनमध्ये सूट देऊन आता अनलॉक 1.0 ला सुरुवात केली आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी दहा राज्यांच्या 38 जिल्ह्यांतील डीएम, महापालिका आयुक्त, जिल्हा रुग्णालय अधीक्षक आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. या बैठकीस महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा, गुजरात, जम्मू काश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातील अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असता तरी निरोगी रुग्णांची संख्याही जास्त आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 24 हजार 430 रुग्ण निरोगी होऊन घरी परतले आहेत. यासह, उपचारानंतर निरोगी रूग्णांचे प्रमाण (recovery rate) 48.49% झाला आहे. तर, सक्रिय प्रकरणांची एकूण संख्या आता 1 लाख 24 हजार 981 आहे.
वाचा-COVID19: 30 सेकंद हा Mouthwash वापरा आणि कोरोनाला गुडबाय करा!
या बैठकीत दाट लोकवस्ती असलेल्या शहरी भागात संक्रमणाचा झपाट्याने प्रसार, घरोघरी सर्वेक्षण करण्याचे महत्त्व, वारंवार तपासणी, वैद्यकीय व्यवस्था आणि कन्टेन्मेंट रणनीती या विषयांवर चर्चा झाली. आरोग्य मंत्रालयाच्या वतीने, अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी आणि तपासणी करण्यासाठी सांगितले गेले.
तसेच, कोरोना नियंत्रणासाठी पायाभूत सुविधा आणि मानव संसाधन व्यवस्थापनाबाबत, आरोग्याच्या पायाभूत सुविधांसाठी पुरेसे नियोजन केले जावे, अशी सूचना केली गेली. रुग्णांसाठी बेडची उपलब्धता व्यवस्थापित करण्यासाठी देखरेखीसाठी पुरेशी पथके पुरविली पाहिजेत, एक यंत्रणा बसविली पाहिजे, असेही यावेळी सांगण्यात आले.
वाचा-तुम्ही घरच्या घरीही बनवू शकता हँड सॅनिटायझर; कसं ते वाचा
भारत पाचव्या क्रमांकावर
कोरोनाबाधितांच्या आकड्यात भारतात आता जगातील टॉप-5 देशांमध्ये आला आहे. कोरोनाचं क्रेंद ठरलेल्या स्पेन आणि इटलीला भारतानं मागे टाकले आहे. भारताआधी अमेरिका, ब्राझील, रशिया, ब्रिटन यांचा क्रमांक लागतो. मात्र भारत 5व्या क्रमांकावर असला तरी इतर देशांच्या तुलनेत भारताचा रिकव्हरी रेट हा सर्वात जास्त आहे. भारताप्रमाणेच रशियामध्येही मृतांचा आकडा कमी आहे.
वाचा-संपूर्ण देश झाला ‘अनलॉक’; मात्र या 2 राज्यांनी वाढवला लॉकडाऊन
संकलन, सपादन-प्रियांका गावडे