घरात जागा नाही, म्हणून झाडावर झाले 'क्वारंटाइन'; तरीही पाळताहेत 14 दिवसांचे सगळे नियम

घरात जागा नाही, म्हणून झाडावर झाले 'क्वारंटाइन'; तरीही पाळताहेत 14 दिवसांचे सगळे नियम

मोठ्या शहरात मजुरीची कामं करणारे 7 आदिवासी तरुण आपल्या छोट्या गावात आले, तेव्हा त्यांना हे असं झाडावर क्वारंटाइन करून घेण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. पाहा हे धक्कादायक फोटो...

  • Share this:

कोलकाता, 28 मार्च : Coronavirus च्या साथीला अटकाव करण्यासाठी सर्वांत प्रभावी उपाय म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आणि होम क्वारंटाइन. पण घरात स्वतःला इतर कुटुंबीयांपासून वेगळं ठेवण्यासाठी तेवढी मोठं घरं भारतात सगळ्यांकडेच नाहीत. क्वारंटाइन किंवा आयसोलेशन सोडा, सोशल डिस्टन्सिंगसाठी आवश्यक 6 फूट अंतर ठेवलं तरी खोली आणि घर संपेल, अशी परिस्थिती देशातल्या बहुतेक भागात आहे. छोटी घरं आणि अधिक माणसं असणाऱ्या गावांमध्ये क्वारंटाइनची सोय करण्याची नामी शक्कल एका गावात शोधून काढण्यात आली आहे.

मोठ्या शहरात मजुरीची कामं करणारे 7 आदिवासी तरुण आपल्या छोट्या गावात आले, तेव्हा त्यांना झाडावर क्वारंटाइन करून घेण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. हे गाव सोशल डिस्टन्सिंग आणि क्वारंटाइनचे सगळे नियम पाळत आहे आणि होम क्वारंटाइन आवश्यक असणाऱ्या या शहरातून आलेल्या गावकऱ्यांना त्यांनीच झाडावर तात्पुरती मचाणासारखी सोय करून दिली आहे.

चेन्नईला एका मोटार उत्पादन कंपनीत सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यात हे 7 तरुण कामाला होते. ते मुळचे पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातल्या बलरामपूर भागातल्या एका गावातले. चेन्नईत ते काम करत असलेल्या कारखान्यानं लॉकडाउन केलं त्यानंतर हे मजूर मजल दरमजल करत बंगालमध्ये आपल्या गावी परतले.

गावात आल्याबरोबर त्यांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली. प्रवासादरम्यान कोरोनाची लागण होण्याचा धोका लक्षात घेऊन त्यांना विलगीकरणाचा सल्ला दिला गेला. पण यातल्या कुणाचंच घर वेगळं राहाण्याच्या दृष्टीने मोठं नव्हतं. म्हणून गावानेच त्यांना असं झाडावर क्वारंटाइन करण्याचं ठरवलं. त्यांना सोयीच्या फांदीवर अंथरुण घालून छत तयार करून देण्यासाठी गावकऱ्यांनी मदत केली. आता गावकरीच या तरुणांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था बघतात. झाडाखाली त्यांचा डबा आणि अन्न-पाणी आणून ठेवलं जातं.

गावकरी तिथून निघून गेले की हे 7 जण झाडाखाली उतरतात.

या 7 जणांपैकी एकालाही अद्याप लक्षणं दिसलेली नाहीत. पण आम्ही 14 दिवसांचं विलगीकरण पूर्ण करणार आहोत आणि सरकारने दिलेले सगळे नियम आम्ही पाळत आहोत, असं या तरुणांनी सांगितलं.

अन्य बातम्या

Coronavirus मुळे गमावले जवळचे 10 लोक, धक्का सहन न झाल्यानं साध्वीचा मृत्यू

'माझं राज्य संकटात आहे', आईच्या पार्थिवाला अग्नी देऊ अधिकारी लगेच कर्तव्यावर हजर

First published: March 28, 2020, 7:00 PM IST

ताज्या बातम्या