रायपूर 27 डिसेंबर : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित धर्मसंसद 2021चा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात आला आहे. याठिकाणी धर्मसंसदेच्या (Dharm Sansad 2021) शेवटच्या दिवशी संत कालीचरण यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरत देशाच्या फाळणीसाठी बापूंनाही जबाबदार धरलं (Kalicharan On Mahatma Gandhi). यानंतर कालीचरण यांच्यावर रायपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कालीचरण यांच्या या वादग्रस्त विधानावर (Controversial Statement of Saint Kalicharan) काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्यावर टीका केली आहे. महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कालीचरण यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेते आणि रायपूर महानगरपालिकेचे अध्यक्ष प्रमोद दुबे यांच्या तक्रारीनंतर कालीचरण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायपूर शहरातील रावण भटा मैदानावर दोन दिवसीय धर्मसंसद कार्यक्रमाच्या समारोपावेळी कालीचरण म्हणाले, इस्लामचे ध्येय राजकारणाच्या माध्यमातून राष्ट्रावर कब्जा करणं आहे. 1947 मध्ये आमच्या डोळ्यांसमोर त्यांनी कब्जा केला होता, असंही ते म्हणाले. आधी इराण, इराक आणि अफगाणिस्तान ताब्यात घेतलं. राजकारणाच्या जोरावर त्यांनी बांगलादेश आणि पाकिस्तान काबीज केलं. मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या केल्याबद्दल मी नथुराम गोडसेला सलाम करतो, असं ते पुढे म्हणाले.
यह भगवाधारी फ़्रॉड राष्ट्रपिता महात्मा गाँधी को सरेआम गालियाँ दे रहा है, इसे तत्काल अंदर करना चाहिए। गाँधी जी से किसी को वैचारिक मतभेद हो सकता है,पर उनका अपमान करने का हक किसी को नहीं है। यह अक्षम्य अपराध है।pic.twitter.com/ToQF1ZC8AJ
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) December 26, 2021
कालीचरण यांचे हे वादग्रस्त विधान व्हायरल झाल्यानंतर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी धर्मसंसदेशी संबंधित व्हिडिओ शेअर करत कालीचरण यांची खिल्ली उडवली. त्यांनी लिहिलं की, सत्य आणि अहिंसेचा कधीच खोटारडे आणि हिंसक लोक पराभव करू शकत नाही. बापू, आम्हाला लाज वाटते, की तुमचे मारेकरी आजही जिवंत आहेत.
रायपूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितलं की, "काँग्रेस नेते प्रमोद दुबे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शहरातील टिकरापारा पोलीस ठाण्यात कालीचरण महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाबाबत बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कालीचरण महाराज यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
कालीचरण महाराज यांच्या वक्तव्याचा निषेध करत प्रदेश काँग्रेस कमिटीचे संपर्क विभाग प्रमुख सुशील आनंद शुक्ला यांनी रविवारी निवेदन दिलं. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, "महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर अत्यंत आक्षेपार्ह आहे आणि कालीचरण यांनी आधी ते संत असल्याचं सिद्ध करावं."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.