नवी दिल्ली 10 मार्च : गेल्या काही महिन्यांपासून नाराज असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांनी राजीनामा पाठवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. देशभर रंगोत्सवाची धूम असताना दिल्लीत राजकीय वातावरण तापलं आहे. मध्यप्रदेशातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते. तिथे तिनही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. ज्योतिरादित्य हे सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. तर ते स्वतंत्र पक्ष काढतील असंही बोललं जातंय. या आधी मध्यप्रदेश सरकारमधल्या शिंदे समर्थकांनी राजीनामे दिले आहेत.
कर्नाटक नंतर आता मध्यप्रदेशमध्ये सत्तेचं नाट्य रंगलं आहे. आता या नाट्याला आज गंभीर वळण मिळालं आहे. कमलनाथ सरकारच्या तब्बल 22 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहे. एकाचवेळी 22 मंत्र्यांनी राजीनामे दिलेल्यामुळे काँग्रेस अडचणीत सापडले आहे.
कर्नाटकमध्ये भाजपने फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता काबीज केली. त्यानंतर भाजपने आपला मोर्चा मध्य प्रदेशकडे वळवला. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये मध्य प्रदेशच्या राजकारणात हालचालींना वेग आलाआहे. काँग्रेस सरकारमधले काही मंत्रीच बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याचं बोललं जात आहे. तसंच, काँग्रेसचे 6 मंत्री आणि 11 आमदार बंगळुरूमध्ये असल्याचं बोललं जात आहे. या सर्वांचे फोन स्वीच ऑफ आहेत आणि ते कुठे आहेत याची अधिकृत माहिती अद्याप दिली गेलेली नाही. हे सर्व आमदार आणि मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक असल्याचं बोललं जात आहे.
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) March 10, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jotiraditya shinde