भोपाळ 10 मार्च : मध्यप्रदेशातलं काँग्रेसचं कमलनाथ सरकार संकटात सापडलं आहे. पक्षाचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर पक्षाच्या 21 आमदारांनीही राजीनामा दिलाय. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे. या आधीही ज्योतिरादित्य शिंदे यांना मानणाऱ्या काही मंत्री आणि आमदारांनी राजीनामा दिला होता. ते मंत्री आणि आमदार बंगळुरमध्ये असल्याचं बोललं जातं आहे. भाजपचे पक्ष प्रभारी खासदार विनय सहस्त्रबुद्धे हे तातडीने भोपाळमध्ये दाखल झाले आहेत. तर दिल्लीतून तातडीने भोपाळमध्ये दाखल झालेले मुख्यमंत्री कमलनाथ हे डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करत आहेत. मात्र परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेल्याचा अंदाज राजकीय क्षेत्रात व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मध्यप्रदेशात कमळ फुलणार असल्याचं संकेत मिळत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नाराज असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांनी राजीनामा पाठवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. देशभर रंगोत्सवाची धूम असताना दिल्लीत राजकीय वातावरण तापलं आहे. मध्यप्रदेशातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.
संबंधित - मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, कमलनाथ सरकारच्या 22 मंत्र्यांचे राजीनामे
काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते. तिथे तिनही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. ज्योतिरादित्य हे सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. तर ते स्वतंत्र पक्ष काढतील असंही बोललं जातंय. या आधी मध्यप्रदेश सरकारमधल्या शिंदे समर्थकांनी राजीनामे दिले आहेत.
संबंधित - काँग्रेसमध्ये भूकंप, ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजीनामा
कर्नाटक नंतर आता मध्यप्रदेशमध्ये सत्तेचं नाट्य रंगलं आहे. आता या नाट्याला आज गंभीर वळण मिळालं आहे. कमलनाथ सरकारच्या तब्बल 22 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहे. एकाचवेळी 22 मंत्र्यांनी राजीनामे दिलेल्यामुळे काँग्रेस अडचणीत सापडले आहे. तर आमदारांनी पक्ष सोडू नये म्हणून त्यांना मंत्रिपदाचं आमीष दाखवलं जात असल्याचं बोललं जातं आहे.