• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • या जिल्ह्यात Selfie काढणं बॅन; सेल्फी काढल्यास दाखल होणार गुन्हा

या जिल्ह्यात Selfie काढणं बॅन; सेल्फी काढल्यास दाखल होणार गुन्हा

सेल्फी काढणं गुजरातमधील डांग जिल्ह्यात (Clicking a Selfie) हा गुन्हा (Criminal Offence) म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात सेल्फी काढताना दिसल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होणार आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 30 जून: 'सेल्फी तो बनता है' हे आजच्या तरुणाईचं घोषवाक्य आणि ब्रीदवाक्य आहे, असं म्हटलं तरी अतिशयोक्तीचं ठरणार नाही. कारण मित्र-मैत्रिणी एकत्र आल्यावर, मौजमजा करताना, फिरायला गेल्यावर किंवा अगदी एकटं असतानासुद्धा वेगवेगळ्या कारणांनी सेल्फी काढले जातात. जी क्रिया आणि तिच्याबद्दलचा शब्दही साधारण दशकभरापूर्वीच जन्माला आला, ती क्रिया आज तरुणाईच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेली आहे, पण आनंदाचे मूड्स टिपणाऱ्या सेल्फीवर नंतर विरजण पडल्याची वेळ येत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. चांगल्या, आकर्षक, धाडसी सेल्फीसाठी आणि त्यावर लाईक्स मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाताना तरुणाई स्वतःच्या जिवाला असलेल्या धोक्याचाही विचार करत नाही. त्यामुळे अनेक दुर्घटना घडल्या असून, जगभरात सेल्फीमुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांपैकी निम्म्यांचा मृत्यू भारतात झाला आहे. या पार्श्वभूमीवर, गुजरातच्या (Gujarat) डांग जिल्ह्यात (Dang) सेल्फी काढणं (Clicking a Selfie) हा गुन्हा (Criminal Offence) म्हणून घोषित करण्यात आला आहे. याचा अर्थ असा, कि या जिल्ह्यात सेल्फी काढताना दिसल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होणार आहे. पीटीआय आणि रॉयटर्स या वृत्तसंस्थांच्या हवाल्याने 'लाइव्ह मिंट डॉट कॉम'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. दक्षिण गुजरातमधल्या डांग जिल्ह्यात सापुतारा (Saputara) हे निसर्गसौंदर्याने नटलेलं, लोकप्रिय हिलस्टेशन (Hill station) आहे. तसंच, तिथे अनेक धबधबेही (Waterfalls) आहेत. कोरोनाशी निगडित असलेले निर्बंध हळूहळू शिथिल होऊ लागल्याने आणि पावसाळा सुरू झाल्याने सापुतारा आणि डांग जिल्ह्यातल्या अन्य पर्यटनस्थळांकडे पर्यटकांची पावलं वळू लागली आहेत. अशा पर्यटनस्थळी गेल्यावर सेल्फी काढण्याचा मोह सर्वांनाच होतो, मात्र दुर्घटना होण्याचा धोका पावसाळ्यात खूप जास्त प्रमाणात असतो. या पार्श्वभूमीवर, डांग जिल्ह्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून लागू असलेल्या सेल्फीबंदीच्या निर्बंधांची नवी अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. अतिरिक्त निवासी जिल्हाधिकारी टी. डी. दामोर यांनी 'पीटीआय'ला ही माहिती दिली. या अधिसूचनेनुसार डांग जिल्ह्यात कोणालाही सेल्फी काढताना पकडलं गेल्यास त्या व्यक्तीवर क्रिमिनल ऑफेन्सच्या (Criminal Offence) तरतुदीनुसार कारवाई केली जाऊ शकते.

(वाचा - तंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित? CSIRच्या अहवालातून मोठा खुलासा)

'पर्यटक आणि खास करून तरुण पर्यटक चांगल्या सेल्फीसाठी कोणत्याही थराला जातात. धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढतात. त्यामुळे दरीत पडून पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याच्या काही घटना पूर्वी घडल्या आहेत. काही व्यक्तींचा त्यात मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी झाले आहेत,' असं दामोर यांनी सांगितलं. जुलै 2018 मध्ये सापुतारा येथे एक मनुष्य सेल्फी घेताना दरीत कोसळून त्याचा मृत्यू झाला. ऑगस्ट 2018 मध्ये सापुताराच्या जवळच असलेल्या गिरा धबधब्याजवळ (Gira Waterfall) सेल्फी काढणाऱ्या एका व्यक्तीचा धबधब्यात पडून मृत्यू झाला. या आणि अशा सगळ्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने होर्डिंग लावून पर्यटकांना धोक्याची कल्पना दिली आहे आणि सेल्फी न काढण्याचं आवाहनही केलं आहे. मात्र त्यापुढे जाऊन आता अशा ठिकाणी सेल्फी काढणं हा गुन्हाच ठरवला जाणार असल्याचा निर्णयही घेतला गेला आहे. पर्यटकांच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं.

(वाचा - मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन)

सेल्फीमुळे झालेले मृत्यू या विषयावर अमेरिकेतल्या 'नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीन' (US National Library of Medicine) या संस्थेने अभ्यास केला. त्या अभ्यासाचा अहवाल ऑनलाइन उपलब्ध आहे. त्या संस्थेच्या नोंदीनुसार, ऑक्टोबर 2011 ते नोव्हेंबर 2017 या कालावधीत सेल्फी काढण्यामुळे 137 दुर्घटना जगभरात घडल्या. त्यात 259 जणांचा मृत्यू झाला. त्यातले सर्वाधिक म्हणजे 50 टक्क्यांहून मृत्यू भारतातले असून, त्याखालोखाल रशिया, अमेरिका आणि पाकिस्तानातल्या मृत्यूंचा क्रमांक लागतो. बुडणं, उंचावरून खाली पडणं किंवा वाहन दुर्घटना असं या दुर्घटनांचं स्वरूप आहे. मृतांचं सरासरी वय 22.94 वर्षं आहे. त्यात 72.5 टक्के पुरुष, तर 27.5 टक्के स्त्रियांचा समावेश आहे. धोकादायक वर्तनामुळे घडलेल्या अपघातांची संख्या जास्त आहे, असंही या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. या सगळ्याचा विचार करता, केवळ डांग जिल्ह्यातच नव्हे, तर कुठेही असताना सेल्फी काढताना आपला आणि आपल्या बरोबरच्या कोणाचाही जीव धोक्यात घातला जाणार नाही, याची काळजी तरुणाईने आणि सर्वांनीच घेतली, तर या दुर्घटना सहज टाळता येण्यासारख्या आहेत.
First published: