पाटणा, 31 ऑगस्ट : बिहारमध्ये पुन्हा एकदा परिक्षार्थी उमेदवारांवरून गोंधळ झाला आहे. बुधवारी पाटणा येथील बिहार लोकसेवा आयोगाच्या (बीपीएससी) कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या उमेदवारांवर पोलिसांनी लाठीमार केला. लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - विद्यार्थी नेते दिलीप कुमार यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. दिलीपने पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला आहे. तर काही दिवसांपूर्वीही पाटण्यात पोलीस आणि प्रशासनाने शिक्षक परिक्षार्थी उमेदवारांवर लाठीमार केला होता. यानंतर राजकीय गदारोळ सुरू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, बिहार लोकसेवा आयोगाच्या (BPSC) 67 व्या परीक्षेत केलेल्या बदलांच्या निषेधार्थ उमेदवार बुधवारी रस्त्यावर उतरले. टक्केवारी पद्धती आणि एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याच्या मागणीवर उमेदवार सतत ठाम आहेत. तर बीपीएससीने पॅटर्न बदलून दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याची घोषणा केली होती. यानंतर उमेदवारांनी त्याला विरोध केला. आंदोलक विद्यार्थी बीपीएससी कार्यालयाचा घेराव करण्यासाठी बाहेर आले असता पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतरही त्यांनी न ऐकल्याने पोलिसांनी त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या बळाचा वापर केला. बिहारमधील शिक्षक उमेदवारही पुनर्स्थापनेचा सातवा टप्पा सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. हेही वाचा - SBI Alert: एसबीआय ग्राहकांना 6000 रुपये मिळणार? तुम्हालाही असा मेसेज आलाय का? उपमुख्यमंत्र्यांवर आरोप - अलीकडेच त्यांच्या शिक्षक उमेदवारांवर पाटणा पोलिस आणि प्रशासनाच्या पथकाने लाठीमार केला होता. यानंतर जोरदार राजकीय गदारोळ झाला. भाजपने या मुद्द्यावरून नितीश सरकारला घेरले. तर उमेदवारांनी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर आश्वासनाचा भंग केल्याचा आरोप केला आहे. आता शिक्षक उमेदवारांनी नितीश सरकारला 5 सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे याप्रकरणात आता पुढे काय होते, ते पाहणे महत्त्वाचे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.