लखनऊ, 10 सप्टेंबर: भाजपच्या एका माजी मंत्र्याचा (BJP Former Minister) त्यांच्या राहत्या घरात संशयास्पद मृतदेह आढळल्याची (Suspicious death) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी संबंधित मंत्र्याची टॉवेलनं गळा आवळून हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. ही हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणातून केली याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
आत्माराम तोमर (Atmaram Tomar murder) असं हत्या झालेल्या भाजपच्या माजी मंत्र्याचं नाव आहे. मृत तोमर यांना 1997 साली भाजपानं मंत्रिपद दिलं होतं. तसेच ते जनता वैदिक कॉलेजचे मुख्य प्राध्यापक देखील राहिले आहेत. तोमर यांची उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये राहत्या घरात हत्या करण्यात आली आहे. आज सकाळी ही खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी तोमर यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
हेही वाचा-प्रेमप्रकरणात तरुणाला शिक्षा; नातेवाईकांनी पाळत ठेवून लव्ह स्टोरीचा केला The End
नेमकं काय घडलं?
बागपत येथील बडौत बिजरौल रोड परिसरात आत्माराम तोमर यांचं निवासस्थान आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी काल रात्री घरात प्रवेश करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्यांनी टॉवेलनं तोमर यांचा गळा आवळला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. तोमर यांची कारदेखील गायब आहे. आज सकाळी तोमर यांचा ड्रायव्हर घरी पोहोचला तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. तसेच घरासमोरील कारदेखील गायब होती.
हेही वाचा-नर्सचा ड्रेस घालून आली अन् पळवलं चिमुकलीला, ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
यानंतर ड्रायव्हरनं घराचं दार तोडून आत प्रवेश केला असता, बेडवर तोमर यांचा मृतदेह आढळला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर टॉवेल पडलेला होता. धक्कादायक प्रकार कळताच ड्रायव्हरनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. मृत भाजपचे माजी मंत्री आत्माराम तोमर यांचा मुलगा डॉ. प्रतापही घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या मृत्यू किंवा हत्येचं कोणतंही कारण समोर आलं नाही. पोलीस या घटनेची सध्या चौकशी करत आहेत, लवकरच मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल, असं पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Murder, Uttar pradesh