नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : : शिवसेनेला नवं नाव आणि पक्षचिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला नाव तर मिळाले आहे, पण अजूनही पक्षचिन्ह मिळाले नाही. त्यामुळे आता शिंदे गटाला आजच निवडणूक आयोगाकडे पर्याय द्यावे लागणार आहे. अखेरच्या क्षणी ईमेलद्वारे शिंदे गटाकडून 3 पर्यायी चिन्ह पाठवले आहे. शंख, रिक्षा, तुतारी फुंकणारा माणूस ही चिन्हं सादर केल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव आणि ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव बहाल केले. मात्र, शिंदे गटाला कोणतेही चिन्ह मिळू शकलेले नाही. शिंदे गटाने त्रिशूळ, उगवता सुर्य आणि गदा असे चिन्ह दिले होते. पण, आयोगाने ते रद्द ठरवले.
आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे निवडणूक पर्यायी चिन्हांचा प्रस्ताव पाठवला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मुक्त चिन्हांऐवजी नवीन चिन्हांचा पर्याय देण्याचा एकनाथ शिंदे गटाचा प्रयत्न आहे. शंख, रिक्षा, तुतारी फुंकणारा माणूस ही चिन्हं सादर केली आहे.
('त्या थडग्यावर तुमची नातवंडेही...', शिवसेनेची शिंदे गटावर जळजळीत टीका)
याआधी निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली होती. धार्मिक चिन्ह असल्यानं निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून नव्याने तीन चिन्ह द्यायला सांगण्यात आली आहेत.
(नव्या चिन्हासोबतही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं जुनं नातं, मशाल आणि सेनेचा संबंध काय?)
दरम्यान, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. या ट्वीटसोबत एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा स्वत:चा फोटोही शेअर केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.