मुंबई, 11 ऑक्टोबर : ‘ही तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद. महाराष्ट्राच्या दुष्मनांचे दफन करायला हवे. त्यांच्या थडग्यांवर फक्त एवढेच लिहायचे, ‘येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेने कायमचे गाडले आहे!’ त्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील! हे राज्य श्रींचे आहे. शिवरायांचे आहे. शिवसेना शिवरायांचा अंश आहे. तो अंश तुम्ही कसा मिटवणार? असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं. शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटामध्ये वादाचा कडेलोट झाला. धनुष्यबाण गोठवल्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच मुद्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे.
‘सत्याला आणि खुनाला वाचा फुटतेच असे म्हणतात, पण मिंधे-फडणवीस युगात असत्यालाही वाचा फुटू लागली आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाचे चिन्ह गोठवून शिवसेना हे नाव वापरण्यास बंदी केली. या अन्यायाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्राचे मन पेटून उठले असताना मिंधे गटाचे प्रवक्ते व राज्याचे शिक्षणमंत्री केसरकर यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे सत्य व न्यायाचा विजय असल्याचे म्हटले आहे. जगात न्याय आहे असे केसरकरांसारख्या बाजारबुणग्यास वाटणे साहजिकच आहे. कारण हा माणूस कधीच कुणाचा होऊ शकला नाही. अनेक पक्षांत फिरून हे महाशय शिवसेनेत आले व मंत्रिपदाचे गाजर दिसताच मिंधे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेनेवर दिल्लीचा आघात म्हणजे महाराष्ट्राचा घात हा स्वाभिमानी विचार त्यांच्या मनालाही शिवणार नाही’ अशी टीकाही केसरकरांवर करण्यात आली. (निवडणूक आयोगाने दिलं नवं नाव, बाळासाहेबांच्या त्या फोटोसह एकनाथ शिंदेंची पहिली रिएक्शन) ‘भारतीय जनता पक्ष व त्यांचे सध्याचे सूत्रधार हे नामर्द आहेत म्हणून त्यांनी थेट लढण्याऐवजी शिवसेनेचे अस्तित्व कागदोपत्री संपविण्याचा दळभद्री प्रकार केला. त्यांना मुंबईवर ताबा मिळवायचा आहे. आम्ही सांगितले, ‘मुंबई महाराष्ट्राची व महाराष्ट्र देशाचा आहे. मुंबईवर ताबा मिळविण्यापेक्षा चीनने गिळलेल्या लडाख, अरुणाचल प्रदेशातील जमिनीवर ताबा मिळवा.’ आम्ही सांगितले, ‘मुंबई देशाचे पोट व तिजोरी भरतच आहे. मुंबईचे काय घेऊन बसलात? आधी पाकव्याप्त कश्मीरचा ताबा घेऊन वीर सावरकरांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार करा’ असं आव्हानच शिवसेनेनं भाजपला दिलं. (नव्या चिन्हासोबतही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं जुनं नातं, मशाल आणि सेनेचा संबंध काय?) ‘ज्या प्रबोधनकारांनी मराठी माणसांच्या संघटनेस ‘शिवसेना’ हे ज्वलंत नाव दिले व ज्या शिवसेनेसाठी आपले सुपुत्र बाळ केशव ठाकरे यांना महाराष्ट्र सेवेसाठी अर्पण केले, त्या शिवसेनेचे अस्तित्व मिटविण्याचे अधम व नीच कृत्य जसे एकनाथ शिंदे या गारद्याने केले, तसे या मंडळींनी केले नाही. शिवसेना म्हणजे सर्वच राजकीय पक्षांतील मराठी जनांची माऊली आहे. त्या माऊलीवर हात टाकण्याचे व्यभिचारी कृत्य ज्यांनी केले त्यांना महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचे तळतळाट लागून, त्यांचा राजकीय निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही, असा संताप महाराष्ट्राच्या घराघरांतून व्यक्त होत आहे, अशी जळजळीत टीकाही शिवसेनेनं शिंदेंवर केली.