कोलकाता, 6 एप्रिल : एक अतिशय लोकप्रिय गाणं आहे- ‘ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन..' याचा अर्थ असा होतो की, प्रेमाला (love) वय नसतं. हे कधीही आणि कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं. अशी गोष्ट एका सत्तरीतल्या आजोबा आणि 65 वर्षांच्या आजींसोबत घडलीय. त्यांना या वयात कोणीतरी सोबती मिळाल्याचा आनंद झाला आहे.
सुब्रत सेनगुप्ता आणि अपर्णा चक्रवर्ती यांच्यासोबत ही कहाणी घडलीय. मूळचे पश्चिम बंगालचे (west bengal) असलेले सुब्रत 70 हून अधिक वयाचे आहेत आणि अपर्णा 65 वर्षांच्या आहेत. पण जेव्हा हे दोघे एकमेकांना पहिल्यांदा भेटले, तेव्हा त्यांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर एक जोडीदार (life partner) मिळाल्याची जाणीव झाली.
सुब्रत सेनगुप्ता आणि अपर्णा चक्रवर्ती हे दोघेही अविवाहित आहेत. दोघेही त्यांच्या आयुष्यातील शेवटची काही वर्षे नादिया जिल्ह्यातील वृद्धाश्रमात (old age home) स्वतंत्रपणे घालवण्यासाठी आले होते. पण आपल्या नशिबात वेगळं काही लिहिलंय याची त्यांना कल्पना नव्हती. सर्व बंधनं आणि रुढी तोडून सुब्रत आणि अपर्णा यांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच लग्न करण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठवड्यातच या जोडप्यानं कायदेशीर विवाह केला.
वृद्धाश्रमात राहण्याचा निर्णय घेतला
सुब्रत सेनगुप्ता हे राज्य परिवहन महामंडळाचे निवृत्त कर्मचारी आहेत. न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सुब्रत सांगतात, 'मी राणाघाट उपविभागातील चकदह येथे माझ्या भावाच्या कुटुंबासोबत राहत होतो. पण दोन वर्षांपूर्वी मला त्यांच्या कुटुंबावर ओझं झाल्यासारखं वाटलं. मग मी माझं उर्वरित आयुष्य वृद्धाश्रमात घालवायचं ठरवलं. तर, अपर्णा कोलकाता येथे एका प्राध्यापकांच्या घरी काम करायच्या. सुमारे 5 वर्षांपूर्वी त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं होते. अपर्णा म्हणतात, 'मला माझ्या आई-वडिलांच्या घरी परतायचं होतं. मात्र, घरच्यांनी मला स्वीकारण्यास नकार दिला. माझ्या बचतीच्या जोरावर मी वृद्धाश्रमात गेले आणि शेवटच्या श्वासापर्यंत याच ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला.'
अपर्णा यांचा नकार
जेव्हा सुब्रत यांनी अपर्णाला वृद्धाश्रमात पाहिलं, तेव्हा त्यांना वाटलं की, त्या आपल्या आयुष्यात नवीन आशेचा किरण म्हणून आल्या आहेत. वेळ न घालवता त्यांनी आपल्या मनातले विचार अपर्णा यांना सांगितले. पण अपर्णा यांनी सुब्रत यांचा प्रेम प्रस्ताव नाकारला. अपर्णा त्यांचा स्वीकार करेल, याची सुब्रत यांना खात्री वाटत होती. पण अपर्णा यांच्या नकारानं त्यांचं मन विचलित झालं. त्यानंतर त्यांनी वृद्धाश्रम सोडण्याचा निर्णय घेतला आणि जवळच भाड्याच्या घरात राहू लागले.
हे वाचा - 16 हजार प्रवासी,1 कोटींची दंड वसूल; कोण आहे 'हा' रेल्वेची तिजोरी भरणारा TTE
अपर्णा यांनाही झाली जाणीव
अपर्णा यांच्या नकाराचा सुब्रत यांच्या हृदयावर आणि मनावर खोलवर परिणाम झाला. वृद्धाश्रमातून निघाले असले तरी, त्यांचे मन तिथेच होते. त्यामुळं त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊन ते गंभीर आजारी पडले. याची खबर अपर्णाला मिळाली. ही बातमी ऐकून अपर्णा अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी ताबडतोब सुब्रत यांच्याकडे गेल्या आणि त्याची काळजी घ्यायला सुरुवात केली. त्या म्हणतात की, 'त्यांना अशा वेळी माझी गरज होती. तेव्हा मी त्यांच्यापासून कशी दूर राहणार होते.'
हे वाचा - या राज्याचे मुख्यमंत्री सोडणार 4 गाड्यांचा VVIP Number,0001 नंबर सोडण्याची घोषणा
उरलेलं आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय
अपर्णा यांच्या सेवेनं सुब्रत पूर्णपणे बरे झाले. त्यानंतर अपर्णा यांनी त्यांचा प्रस्ताव स्वीकारला. त्या म्हणल्या, 'वर्ष 2019 मध्ये जेव्हा त्यांनी माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा मी नकार दिला. पण मी खूप रडले. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी देवानं मला ही सुंदर भेट दिली आहे, याची जाणीव मला झाली. अपर्णा आणि सुब्रत यांनी वृद्धाश्रमाचे संचालक गौरहरी सरकार यांना भेटून आपला निर्णय सांगितला. तसंच, अपर्णा यांची पाठवणी करण्यासाठी त्यांचे पालक बनण्याची विनंती केली. त्यांच्या उपस्थितीत दोघांनी कोर्टात लग्न केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolkata, Love story, West bengal