परप्रांतीयांना गावी सोडण्याबद्दल अजित पवारांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र, केली 'ही' मागणी

परप्रांतीयांना गावी सोडण्याबद्दल अजित पवारांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र, केली 'ही' मागणी

आता या मजुरांना त्यांच्या गावी कधी आणि कसे सोडण्यात यावे, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिले आहे.

  • Share this:

मुंबई, 23 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य, जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे ठिकठिकाणी परराज्यातील मजूर अडकून पडले आहे. महाराष्ट्रातही मोठ्या संख्येनं मजूर अडकले आहे. आता या मजुरांना त्यांच्या गावी कधी आणि कसे सोडण्यात यावे, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिले आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी लॉकडाउनची मुदत 3 मे रोजी संपत आहे. लॉकडाउनची मुदत संपल्यानंतर रेल्वेसेवा सुरू झाल्यास, महाराष्ट्रात ठिकठिकाणी थांबलेले परप्रांतीय मजूर बांधव आपापल्या गावी परतण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची आणि त्यामुळे गर्दी उसळून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने, रेल्वे मंत्रालयाने मुंबई व पुणे येथून देशाच्या विविध भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात आणि त्यासाठीचे नियोजन आधीच करावे, अशी मागणी अजित पवार यांनी केंद्राकडे केली आहे.  यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहिले असून परप्रांतीय मजुरांच्या मुद्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा - ठाकरेंना राजीनाम्यासाठी आघाडीच्या नेत्याचे प्लॅनिंग, चंद्रकांत पाटलांचा आरोप

अजित पवार यांनी पत्रात म्हटले आहे की,'केंद्र सरकारने 24 मार्चपासून देशात लॉकडाउन लागू केल्यापासून उत्तरप्रदेश, बिहारसह देशाच्या विविध राज्यातील मजूरबांधव महाराष्ट्रात ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. राज्य शासनातर्फे त्यांच्यासाठी शिबिर व्यवस्था केली असून त्यांना निवास, भोजन, आरोग्यसेवा पुरवण्यात येत आहे. राज्यशासनाच्या शिबिरांमध्ये आजमितीस साडेसहा लाख मजूरबांधव राहत आहेत. स्वयंसेवी संस्थांद्वारेही तितक्याच मजूरांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. टाळेबंदीमुळे राज्यातील उद्योग, बांधकाम, सेवाक्षेत्र बंद असल्यामुळे या मजुरांच्या हाताला काम नाही. दीड महिन्यांपासून शिबिरात राहिल्यामुळे ही मंडळी आपापल्या घरी, कुटुंबात जाण्यास अधीर आहेत.'

लॉकडाउनचा पहिला टप्पा संपला त्या दिवशी मुंबईतील वांद्रे परिसरात उसळलेली गर्दी त्याच अधीरतेचे उदाहरण आहे. रेल्वे मंत्रालयाने सदर वस्तुस्थितीचा विचार करुन केंद्र सरकारतर्फे लागू लॉकडाउनची मुदत 3 मे रोजी किंवा केंद्राने ठरविल्याप्रमाणे  मुदत संपल्यानंतर, ज्यावेळी रेल्वेसेवा सुरू होतील तेव्हा महाराष्ट्रातील परप्रांतीय मजूरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी, मुंबई व पुणे येथून विशेष रेल्वेगाड्या सोडल्यास, या मजुरांना सुरक्षित घरी जाता येईल तसंच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका टाळता येईल', असंही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा - मालेगावमध्ये धक्कादायक प्रकार, लॉकडाऊनमुळे जमावाने पोलिसांवर घेतली धाव

'महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य असल्याने, तसेच येथील बांधकाम व्यवसाय मोठा असल्याने उत्तरप्रदेश, बिहारसह इतर राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीय मजूरांची संख्या देशात सर्वाधिक आहे. हे मजूर असंघटीत क्षेत्रात रोजंदारीवर काम करतात. टाळेबंदीमुळे दीड महिन्यांपासून ते शिबिरात आहेत. त्यांच्या हातांना काम नाही. शिबिरांमध्ये निवास, भोजनाची, वैद्यकीय उपचारांची सोय राज्यशासन आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे करण्यात आली आहे ती यापुढेही निश्चितपणे करण्यात येईल, असं आश्वासनही अजित पवारांनी दिलं.

परंतु, 'जे मजूर आपापल्या गावी परतण्यास अधीर आहेत ते टाळेबंदी संपल्यानंतर मोठ्या संख्येनं बाहेर पडण्याची शक्यता आहे. या शक्यता गृहित धरुन रेल्वेमंत्रालयाने मुंबई आणि पुणे येथून, या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी घेऊन जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन पुरेसा कालावधी शिल्लक असतानाच करावं, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: April 23, 2020, 2:29 PM IST
Tags: ajit pawar

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading