Home /News /maharashtra /

मालेगावमध्ये धक्कादायक प्रकार, लॉकडाऊनमुळे जमावाने पोलिसांवर घेतली धाव

मालेगावमध्ये धक्कादायक प्रकार, लॉकडाऊनमुळे जमावाने पोलिसांवर घेतली धाव

मालेगाव, 23 एप्रिल : मालेगावमध्ये बुधवारी इकबाल पुलावर प्रतिबंधक क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने जमा झाले आणि तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी त्यांना तेथून जाण्यास सांगितले तेव्हा मुस्लिम जमावाने पोलिसांवरच धाव घेतल्याचं समोर आलं आहे. यामध्ये काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. पण परिस्थिती बिघडताना पाहून अधिक पोलीस कर्मचारी घटनास्थळी जमले. जमावाला आवरणं शक्य झालं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे अस्वस्थ होऊन पुलावर लोक जमायला लागल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी त्यांना तेथून जाण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी ऐकले नाही आणि सुरक्षा कर्मचार्‍यांवर दगडफेक केली. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याचं पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळे अनेक स्तरावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात मालेगावमधील या लोकांपर्यंत सरकारच्या सोयी-सुविधा आणि अन्नपुरवठा पोहोचला नाही. त्यात हातावर पोट असणाऱ्यांचं काम बंदं झाल्यामुळे हे लोक आपल्या हक्कासाठी एकत्र आले. त्यामुळे मालेगावमध्ये एकत्र येत लोक आक्रमक झाले हे खरं आहे. पण अशा प्रकारे हा समाज एकत्र येत आक्रमक का झाला?, त्यांनी पोलिसांवर दगडफेक का केली? या प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून या लोकांना योग्य तो अन्नपुरवठा मिळत नाही आहे. एकाच घरात अनेक लोक राहतात. त्यांच्या खाण्याची काहीही व्यवस्था होत नाहीये. प्रशासनाकडून वारंवार आश्वासनं देऊनसुद्धा इथे मदत पोहोचत नाही. त्यामुळे नागरिक एकत्र येत आक्रमक झाला असल्याचं समोर आलं. त्यामुळे इथला जमाव पाहता त्यांच्यापर्यंत आवश्यक गरजा पोहोचणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील मालेगावमध्ये कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या 101 वर आहे. गुरुवारी 5 नवीन प्रकरणे समोर आली. मालेगाव हा महाराष्ट्रातील रेड झोनमध्ये येतो. कोरोना संक्रमणामुळे झालेल्या 269 मृत्यूंसह सर्वाधिक 5,652 संक्रमित रुग्ण महाराष्ट्र आहेत. संकलन आणि संपादन - रेणुका धायबर

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Manoj Khandekar
First published:

पुढील बातम्या