Home /News /national /

शरजील उस्मानीला पुणे पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहावं लागणार, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शरजील उस्मानीला पुणे पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहावं लागणार, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

पुण्यामध्ये 30 जानेवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी (Sharjeel Usmani) याने धार्मिक भावनांना ठेच पोहचवणारं एक वक्तव्य केलं होतं.

पुणे, 10 मार्च: अलीगढ़ मुस्लिम विद्यापीठाचा (ANU) चा माजी विद्यार्थी असणाऱ्या शरजील उस्मानीला (Sharjeel Usmani) चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिले आहेत. पोलिसांनी समन बजावल्यानंतर बुधवारी शरजीलला पुणे पोलिसांसमोर (Pune Police) हजर राहावं लागणार आहे.  फेब्रुवारी 2021 रोजी पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात शरजीलविरोधात आयपीसी कलम 153 (ए) (धर्म, वर्ण व ठिकाण यावरून भिन्न गटांत शत्रुत्व निर्माण करणे) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणी चौकशीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शरजील उस्मानीला आज स्वारगेट पोलीस ठाण्यात हजर राहावं लागणार आहे. ANU चा माजी विद्यार्थी नेता असणारा शरजील उस्मानीला काहीसा दिलासा देखील उच्च न्यायालयाने दिला आहे. शरजील तपासात सहकार्य करत असल्यास त्याच्यावर पुढील सुनावणीपर्यंत कठोर कारवाई नको, असं उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केलं आहे. कोर्टाने पोलिसांना देखील निर्देश दिले आहेत की याप्रकरणात त्यांच्याकडून कोणतीही कारवाई सक्तीने केली जाऊ नये. उस्मानीने काही दिवसांपूर्वी त्याच्याविरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका केली होती. शिवाय त्याने न्यायालयाकडे मागणी केली होती की या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई सक्तीने केली जाऊ नये. (हे वाचा-उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना का द्यावा लागला राजीनामा? वाचा महत्त्वाची कारणं) 30 जानेवारी 2021 रोजी पुणे येथे आयोजित एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केलं होतं. त्याच्या वक्तव्याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात शरजील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानीच्या विरोधात लखनऊ येथील हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Crime news, India, Pune, Pune police, The Bombay High Court

पुढील बातम्या