मुंबई ०४ मार्च : महाराष्ट्र विधानसभेतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं (CM Uddhav Thackeray) भाषण चांगलंच चर्चेत आलं आहे. यावेळी भाजपवर निशाणार साधताना मुख्यमंत्र्यांनी भाजपला अनेक गोष्टींची आठवण करून दिली आहे. यावेळी बाळासाहेबांची आठवण काढत उद्धव ठाकरेंनी म्हटलं, की बाबरी पाडताना येरेगबाळे पळून गेले आणि बाळासाहेब राहिले होते हे लक्षात असू द्या. जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली तर मला त्याचा अभिमान आहे, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते. त्यांच्या याच विधानामुळं आता सपा नेते अबू आझमी (Abu Azmi on Uddhav Thackeray) यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला आहे. इतकंच नाही तर मुस्लिम मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
अबू आझमी म्हणाले, की उद्धव ठाकरे आता केवळ एका पक्षाचे प्रमुख नसून राज्याचे मुख्यमंत्री आहेत. कालच्या भाषणात ते जे काही बोलले ते चुकीचं होतं. एका अपराधासाठी ते स्वतःला श्रेय घेत आहेत. अशात मुस्लिम मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, असं आवाहन आझमी यांनी केलं आहे.
आपल्या भाषणावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते, की बाळासाहेबांची आठवण तुम्ही वेळोवेळी काढता, त्यांना विसरला नाहीत. त्यासाठी धन्यवाद पण त्यांचे हिंदुत्व तुम्ही विसरू नका हे माझे सांगणे आहे. बाबरी पाडताना येरेगबाळे पळून गेले आणि बाळासाहेब राहिले होते हे लक्षात असू द्या. जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली तर मला त्याचा अभिमान आहे, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते. तेव्हा बाबरी आम्ही पाडली नाही म्हणून तुम्ही हात वर केले होते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. राम मंदिर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे होत आहे आणि आता राम मंदिरासाठी हे घरोघर पैसे मागत फिरत आहेत. असे असले तरी ते आमच्यामुळे होते आहे, असे त्यांना दाखवायचे आहे, असा निशाणाही मुख्यमंत्र्यांनी भाजपवर साधला होता.
दरम्यान, अबू आझमी महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहेत. अशात तेच राजीमना मागत असतील तर यांच्यात नेमकं चाललंय काय हा प्रश्न समोर उभा ठाकला आहे. मात्र, दररोज कॉमन मिनीमम प्रोग्रॅमवरून त्यांच्यात वाद होतात. याच कारणामुळे अबू आजमी राजीनामा मागत असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे.