विजय कुमार, प्रतिनिधी ग्रेटर नोएडा, 12 जुलै : पब्जी खेळाचं वेड आता कुठे जरा कमी झाल्याचं दिसून येतं. मात्र गेले काही वर्ष तरुणांवर या खेळाने अशी काही जादू केली होती की, तरुण तहान-भूक हरपून पब्जी खेळत बसायचे. याच खेळातून नोएडाच्या एका तरुणाचा चक्क पाकिस्तानातील एका महिलेवर जीव जडला. दोघांच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मग प्रेमात झालं. दोन महिन्यांपूर्वी ही महिला चक्क आपली 4 मुलं घेऊन थेट नोएडात दाखल झाली. रबूपुरा गावात ही घटना घडली. या अनोख्या प्रेमकहाणीची सध्या देशभरात चर्चा आहे. पोलिसांना याबाबत कळताच त्यांनी ही महिला म्हणजेच सीमा हैदर, तिचा प्रियकर सचिन आणि सचिनचे वडील नेत्रपाल यांना ताब्यात घेऊन तुरुंगात टाकलं. तसंच रबूपुरा गावातील नागरिकही सीमा ही पाकिस्तानी नागरिक असल्याने दहशतवादी असू शकते, असा संशय घेत होते. परंतु आता तिघं तुरुंगातून बाहेर आल्यावर मात्र या लव्हस्टोरीत एक वेगळाच ट्विस्ट आला आहे.
सुरुवातीला सीमावर संशय घेणाऱ्या रबूपुराच्या नागरिकांनी आता ती इथेच राहणार आणि कुठेही जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. गावातील इंद्रजीत नामक व्यक्तीने सांगितलं, ‘सचिन लहानपणापासून आमच्यासोबत राहिलेला आहे. तो खूप चांगला मुलगा आहे. आता सीमासुद्धा सचिनसोबत आमच्याच गावात राहणार. आता आम्ही सर्वांनी तिला आपलं मानलं आहे. सचिन किंवा गावातील इतर कोणी तिला आणायला पाकिस्तानात गेलं नव्हतं, तर ती स्वतः तिच्या मुलांना घेऊन इथे आली आहे. त्यामुळे आता आम्ही तिला आणि तिच्या मुलांना असं रस्त्यावर सोडू शकत नाही.’ मराठमोळ्या अभिनेत्याने 57 व्या वर्षी केलं सहाव्या गर्लफ्रेंडशी लग्न; पत्नी आहे 25 वर्षांनी लहान PHOTOS तर श्याम पाल नामक व्यक्तीने सांगितलं, ‘सचिन गावातील एका दुकानावर काम करतो. तो अतिशय मेहनती आणि शूर मुलगा आहे. संपूर्ण गाव त्याच्यापाठीशी आहे. सचिन आणि सीमाला आता भेटायला जितके लोक येतात, ते सर्वजण आम्हाला तिच्यापासून धोका असल्याचं सांगतात. कोणताही धोका असेल तर त्याचा तपास पोलीस करतील, परंतु आम्हाला ती अजिबात धोकादायक वाटत नाही आणि आता जर ती पुन्हा पाकिस्तानात गेली, तर तिथे तिला मारून टाकलं जाईल. त्यापेक्षा ती आणि तिची मुलं इथेच सुरक्षित आहेत’, असं ते म्हणाले. दरम्यान, यामुळे आता रबूपुराच्या नागरिकांनी पाकिस्तानी वहिनींचं छान स्वागत केलंय, अशा चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत.