हैदराबाद, 30 मार्च : प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी सरकारी कर्मचारी किंवा बँक कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा अनुभव येतो. मात्र, कधी कधी हा निष्काळजीपणा नकळत एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो. अशाच पद्धतीनं युनियन बँकेच्या (Union Bank) कर्मचाऱ्यांचा अक्षरशः जीवघेणा निष्काळजीपणा समोर आला आहे. इथले बँक कर्मचारी बँकेची वेळ संपल्यानंतर चुकून एका 84 वर्षीय वृद्धाला बँकेतच ठेवून निघून गेले. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी या वृद्धाला चुकीनं बंद केल्यानंतर तब्बल 18 तासांनी त्यांची सुटका करण्यात आली. व्यापारी व्ही. कृष्णा रेड्डी (V Krishna Reddy) असं या वृद्धाचं नाव आहे. त्यांना मधुमेहाचा (diabeties) त्रास होता आणि रात्रभर काहीही खायला-प्यायला न मिळाल्यामुळं त्यांची प्रकृती खालावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी बँक उघडून त्यांना वाचवलं. त्या वेळी ते जवळपास बेशुद्धावस्थेतच गेले होते. रेड्डी हैदराबादच्या (Hyderabad) जुबली हिल्स भागात राहतात. सोमवारी सायंकाळी 4.20 च्या सुमारास ते युनियन बँकेच्या ज्युबली हिल्स चेकपोस्ट शाखेत गेले होते. टाइम्स ऑफ इंडियानं पोलिसांच्या हवाल्यानं म्हटलंय की, रेड्डी यांना त्यांचा लॉकर उघडायचा होता. बँक कर्मचारी राधा कुमारी यांनी त्यांना लॉकर रूममध्ये नेलं. तिथून लॉकर उघडल्यानंतर मास्टर चावी देऊन रेड्डी तिथंच सोडून त्या बाहेर आल्या आणि आपलं काम करू लागल्या. जुबली हिल्सचे उपनिरीक्षक डी. नायडू यांनी सांगितलं की, रेड्डी लॉकर रूममध्ये गेल्यानंतर सर्व कर्मचारी 5.30 वाजता बँकेला कुलूप लावून बाहेर पडले. पण लॉकर रूममध्ये गेलेले रेड्डी बाहेर आले की नाही, हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. तसंच बँक बंद करताना तिकडे पाहण्याची तसदीही कोणी घेतली नाही. बँक बंद होती आणि रेड्डी लॉकर रूममध्ये अडकून राहिले. हे वाचा - शववाहिनी न मिळाल्याने 4 महिलांनी 5 KM खांद्यावर नेला वृद्धेचा मृतदेह; VIDEO असा लागला शोध रात्री उशिरापर्यंत रेड्डी घरी न परतल्यानं त्यांचे कुटुंबीय काळजीत पडले. आपण कोठे जात आहोत हे घरच्यांना सांगूनही ते गेले नव्हते. तसंच, सोबत मोबाईलही घेतला नव्हता. अशा स्थितीत कुटुंबीयांनी प्रथम त्यांचा आजूबाजूला शोध घेतला. काहीही न मिळाल्यानं त्यांनी पोलिसात जाऊन हरवल्याची तक्रार (missing complaint) दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेड्डी युनियन बँकेजवळ दिसत होते. पोलिसांनी बँकेचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. यामध्ये ते बँकेत शिरताना दिसत होते पण बाहेर येताना दिसले नाहीत. यावर पोलिसांना रेड्डी बँकेतच असल्याचा संशय आला. हे वाचा - बापरे! दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू यानंतर सकाळी 10.30 वाजता बँक उघडल्यानंतर पोलिसांनी आत जाऊन झडती घेतली. तिथं रेड्डी लॉकर रूममध्ये दिसले. त्यांची प्रकृती चांगली नव्हती. शुगर पेशंट असल्यानं आणि रात्रभर काहीही न खाल्ल्यानं ते अर्धवट बेशुद्धीच्या अवस्थेत पोहोचले होते. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेलं. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यात येत आहे. रेड्डी यांच्या नातेवाईकांनी बँकेविरुद्ध निष्काळजीपणाची तक्रार दिल्यास आवश्यक ती कारवाई केली जाईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.