रुपेश कुमार भगत, प्रतिनिधी गुमला, 29 जून : झारखंडच्या गुमला भागातून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. रस्त्याच्या बांधकामातील दोन मजुरांचा मशीनमध्ये होरपळून मृत्यू झाला. मजूर आत असताना मशीन सुरू करणारा ऑपरेटर मात्र फरार आहे. मृत मजुरांच्या कुटुंबीयांनी रास्ता रोको केल्यावर कंत्राटदार कंपनीकडून दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी 30 लाख रुपयांच्या मदतीचं आश्वासन देण्यात आलं. गुमला जिल्ह्यातील रेडवा भागाजवळ आरकेडी कंपनीकडून रस्त्याचं काम सुरू आहे. या कामादरम्यान 17 वर्षीय भगत आणि 18 वर्षीय प्रदीप उराव हे दोन मजूर मिक्सर मशीनच्या आत जाऊन तिची सफाई करत होते. ते आत असतानाच मशीन सुरू करण्यात आली. त्यात दोघांनाही प्रचंड वेदना झाल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर ऑपरेटरने तिथून पळ काढला. त्याने नकळत मशीन सुरू केलं असावं किंवा मुद्दाम असं करून तो फरार झाला, असा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेबाबत मृतांच्या कुटुंबियांना माहिती मिळताच ते स्थानिक रहिवाशांसह घटनास्थळी दाखल झाले आणि या मृत्यूवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी येत नाहीत तोपर्यंत एकही गाडी जाऊ देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आणि गाड्यांची तोडफोड केली. हे आंदोलन तीव्र होताच जिल्हा प्रशासनाचे अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. भविष्यात 650 वर्ष पुढे जाऊन परत आली व्यक्ती, दुसऱ्या पृथ्वीबद्दल ही केला खुलासा अधिकाऱ्यांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु परिस्थिती आणखी चिघळली. दोन्ही मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटींची मदत मिळायला हवी, अशी मागणी आंदोलकांनी केली. अखेर आमदार जिग्गा सुसारण होरो त्याठिकाणी दाखल झाले आणि परिस्थिती जरा शांत झाली. त्यांनी दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त करून आंदोलकांशी, मृतांच्या कुटुंबियांशी आणि कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सर्वांच्या संमतीने कंपनीकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 30 लाखांची मदत देण्याचं ठरलं. त्यानंतर आंदोलक आपापल्या घरी गेले आणि वातावरण पूर्णपणे शांत झालं.