नागपूर, 23 ऑगस्ट: देशात लॉकडाऊन जारी केल्यापासून सायबर गुन्हेगारीत (Cyber Crime) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विविध प्रकारचे आमिष दाखवून शेकडो नागरिकांना गंडा घातल्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. तरीही नागरिक सतर्कता बाळगत नाहीत. अशीच एक घटना नागपूरातून समोर आली आहे. कमी व्याजाच्या बदल्यात मोठ्या रक्कमेचं कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या बहाण्यानं (lure of low interest loan) गंडा (Online fraud) घालणाऱ्या एका टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यातील मास्टरमाइंड महिलेच्या नागपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे.
पूजा सिंग असं अटक केलेल्या 53 वर्षीय महिलेचं नाव असून ती हरियाणातील हिसार जिल्ह्यातील लाडवा येथील रहिवासी आहे. संबंधित महिला देशातील विविध भागातील नागरिकांना फोनवरून संपर्क साधून त्यांना कमी व्याजात कर्ज उपलब्ध करून देण्याचं आमिष दाखवत. 'आपण बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचं भासवून तुम्हाला कमी व्याजदरात दीर्घ मुदतीचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, अशी थाप मारत असत. त्यानंतर विविध कारणं सांगून आरोपी महिला भोळ्या भाबड्या लोकांची फसवणूक करत असे.
हेही वाचा-ब्लॅकमेलर जावई : सासऱ्यावर केली बलात्काराची खोटी केस, महिला गोंधळल्याने पर्दाफाश
आरोपी पूजा सिंग हिने आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं देशातील शेकडो लोकांना गंडा घातला आहे. पोलिसांनी सध्या पूजा सिंगला अटक केली असून तिच्या अन्य साथीदारांची ओळख पटवण्याचं आणि त्यांचा शोध घेण्याच काम पोलीस करत आहेत. रेल्वे विभागात कार्यरत असणाऱ्या देवानंद अनिल शेंडे यांनी नागपूरातील अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
हेही वाचा-टेस्ट ड्राईव्ह उठली जिवावर! कारला दिली धडक, दोन बाईकस्वारांनाही उडवलं
नेमकं प्रकरण काय आहे?
आरोपी पूजानं फिर्यादी शेंडे यांना फोन करून, आपण बजाज फायनान्समधून बोलत असल्याचं भासवून दहा वर्षांसाठी 6.9 टक्के व्याजदरानं 8 लाखांचं कर्ज उपलब्ध करुन देऊ शकतो, असं सांगितलं. त्यासाठी शेंडे यांची अनेक प्रकारे समजूत घालण्यात आली. त्यानंतर आरोपींनी शेंडे यांचे कागदपत्रेही जमा केली. कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली आरोपींनी विविध कारणं देत शेंडे यांना 28 हजार रुपयांना गंडा घातला. पण शेंडे यांना संशय आल्यानंतर त्यांनी आपल्याला कर्ज नको असल्याचं सांगत आरोपींकडे पैसे परत मागितले.
हेही वाचा-वजन कमी करण्यासाठी दिलं भलतंच इंजेक्शन; जिम ट्रेनरचं तरुणीसोबत घृणास्पद कृत्य
पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. आरोपी पूजानं आणि तिचे साथीदार विकास जैन, दीपक चव्हाण, संजीव कुमार, ओमप्रकाश यांनी शेंडे यांचा फोन स्वीकारणं बंद केलं. तसेच आरोपींनी आपला फोनही स्वीच ऑफ केला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच शेंडे यांनी अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी महिलेचा पत्ता शोधून काढत तिला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Financial fraud, Nagpur