भिवंडी, 02 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह ठाणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते, गटार तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. असं असताना भिवंडीत रस्त्यावरील गटारांचे लोखंडी चेंबर चोरून नेल्याचा (Theft Iron chamber of gutters) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भिवंडी शहरात खड्ड्यांमुळे रस्त्यांची आधीच दुरावस्था झाली आहे.
असं असताना रस्त्यावरील चक्क लोखंडी चेंबर चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Theft Viral Video) झाला आहे. संबंधित घटना भिवंडी शहरातील तांडेल मोहल्ला परिसरात घडली आहे. याठिकाणी रस्त्यावरील लोखंडी चेंबरची चोरी करणारी महिलांची एक टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
ही टोळी रात्रीच्या सुमारास रिक्षा घेऊन परिसरात दाखल होते. कोणी जागं नसल्याचं पाहून महिला परिसरातील लोखंडी चेंबर पटापट काढण्यास सुरुवात करतात. त्यानंतर हे लोखंडी चेंबर रिक्षामध्ये टाकून घटनास्थळावरून पसार होतात. पण अशाप्रकारे चेंबर चोरून नेल्याने लहान वाहने, नागरिक, लहान मुलं या चेंबरमध्ये पडून अपघात होण्याचा धोका निर्माण होतं आहे.
हेही वाचा-मैत्रिणीच्या मुलीला बर्थडेला नेलं अन्..; चिमुकलीच्या कौमार्याचा 40 हजारांत सौदा
संबंधित चोरट्या महिला रात्रीच्या सुमारास अशा प्रकारे चोरी करत नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने पावसाचं पाणी ओसंडून वाहू लागताच, अशा ठिकाणी मोठे अपघात होण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे महापालिका प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं असल्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhiwandi, Crime news, Theft, Video