मुंबई, 21 जून : शिवसेनेचे (shivsena) नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी जवळपास 29 आमदारांना घेऊन गुजरात गाठले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक आणि दुसऱ्या फळीतले नेते असलेले एकनाथ शिंदे यांच्यावर ही वेळ का आली याची चर्चा रंगली आहे. पण, त्याचीही काही खास कारण आहे.. एकनाथ शिंदे शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते आहेत. सर्व आमदारांचे प्रमुख असूनही त्यांनी प्रमख निर्णय प्रक्रियेतून नेहमी दूर ठेवलं जातं. हे कुणाच्या सांगण्यावरून केलं जात होतं. याचीही माहिती एकनाथ शिंदे यांना होती. तरीही कधी ना कधी न्याय मिळेल या आशेने ते पक्षात कार्यरत राहिले. मात्र राज्यसभा आणि विधान परीषद निवडणुकीची सर्व सूत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे दिली आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांमध्ये बंडाची ठिणगी पेटली. गेली अडीच वर्षे मनात धगधगणाऱ्या ज्वालामुखीचा अखेर आज स्फोट झाला. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी सिचवलं होतं. तसं अधिकृत पत्रही राज्यपालांना देण्यात आलं होतं. मात्र शिवसेना नेते संजय राऊत आणि सुभाष देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध केला होता. शिवसेना पक्षात आणखी एक नारायण राणे निर्माण होईल आणि मग तो पक्षाला डोईजड होईल. अशी कारणं देत उद्धव ठाकरे यांचे कान भरण्यात आले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री बनण्याचे रास्ता रोखला गेला. गेल्या अडीच वर्षात देखील पक्षातील प्रमुख निर्णय प्रक्रियेतून एकनाथ शिंदे यांना परस्पर दूर ठेवलं जात होतं. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सर्वात बलाढ्य नेते आहेत. असं असूनही त्यांना मिळणारी सापत्नं वागणूक शिवसेनेच्या इतर आमदारांनाही खटकत होती. राज्यभरातील कुठलाही शिवसेना कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी असो एकनाथ शिंदेकडे कोणतेही काम घेऊन आला तर तो खाली हाताने परत जात नाही. त्यामुळे शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे सर्वाधिक लोकप्रिय मंत्री होते. विधिमंडळात सर्वाधिक आमदारांचे पाठबळ एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदे यांना जर शिवसेनेला जय महाराष्ट्र केला तर ते शिवसेनेचं आतापर्यंतचं सर्वाधीक मोठं राजकीय नुकसान असेल. असं राजकीय नुकसान जे राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक आणि छगन भुजबळ यांनीही शिवसेना सोडताना केलं नव्हतं. एकनाथ शिंदे यांच्यापुढील राजकीय पर्याय १) समर्थक आमदारांसोबत स्वतंत्र पक्ष निर्माण करणं. २) स्वतंत्र पक्ष निर्माण करून भाजपला बाहेरून पाठिंबा देऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्नं होऊ शकतो. ३) दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाने अथवा प्रेरणेने स्वतंत्र पक्ष निर्माण करणे. ४) एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह भाजपमध्ये पक्ष प्रवेश करून पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्याचा पर्याय. ५) एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात समन्वय घडवून आणून पुन्हा एकदा शिवसेनेत सक्रिय होणं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.