मुंबई, 03 डिसेंबर : राष्ट्रवादीचे (NCP)अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वारसदार कोण असणार, नेतृत्व कुणाकडे असणार? अशी चर्चा अनेकदा होत असते. अखेर या चर्चेबद्दल खुद्द शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी पक्षातील तीन नेत्यांचा उल्लेखही केला आहे.
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दैनिक लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी शरद पवार यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवार यांनी राजकीय, सामाजिक आणि राष्ट्रीय राजकारणावर आपली रोखठोक भूमिका मांडली.
भविष्यात राष्ट्रवादीचे नेतृत्व कुणाकडे असणार असा सवाल विचारला असता शरद पवार म्हणाले की, 'राष्ट्रवादीमध्ये तरुणांचा संच मोठा आहे. या सगळ्यातून मान्य असतील अनेक लोकं मी सांगू शकतो. अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे अशी नावांची मालिका मी घेऊ शकतो. आज राष्ट्रवादी पक्षामध्ये असे अनेक नेते आहे जे नेतृत्व करण्याच्या कुवतीचे आहेत.'
सुप्रिया सुळे होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री?
काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भविष्यात शरद पवार हे पुतण्याला नव्हे तर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील असं विधान करून अजित पवारांना टोला लगावला होता. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा सुरू झाली होती. शरद पवार यांना याबद्दल विचारले असता त्यांनी स्पष्ट मत मांडले आहे. 'सुप्रिया सुळे यांना राज्यात इंटरेस्ट नाही, त्यांना राष्ट्रीय राजकारणात अधिक रस आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना संसदपटू पुरस्कार मिळाला होता. प्रत्येकाचा एक इंटरेस्ट असतो, त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट हा राज्यात नसून तो राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात आहे' असं शरद पवार यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कसे लढणार?
'कुणाच्याबद्दल व्यक्ती दोष आणि विरोधाला विरोध म्हणून ही भूमिका चालणार नाही. आपण त्याला पर्यायी कार्यक्रम दिला पाहिजे. काय आपण करू पाहत आहोत, कसे करू पाहत आहोत. त्यातून बहुसंख्य लोकांना विश्वास देता आला पाहिजे. ज्या वेळी आम्ही एकत्र बसू केवळ पर्याय काय असणार, नेतृत्व काय करणार आहे, याची चर्चा आम्ही करणार आहोत.' असंही शरद पवार यांनी सांगितले.
विरोधी पक्षाचे नेतृत्व करणार का?
देशामध्ये तीन मोठे नेते आहे, नरेंद्र मोदी, सोनिया गांधी आणि आपण आहात. सर्व लोकांनी एकत्र बसून आपण त्याचे नेतृत्व करावे असं आपणास वाटते का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की 'एकत्र बसावे ही तुमची भावना आहे, त्याच्याशी मी सहमत आहे. त्याच्यातून पर्यायी शक्ती उभी केली पाहिजे. पण हे करत असताना अ किंबा ब नावाची व्यक्ती येईलच हा विचार करून ते एक्य कधी होणार नाही. आपण एकत्र बसून कुणी याची जबाबदारी घ्यायची याचा निर्णय कुणीही घेऊ शकतो. जो सर्वांना मान्य असेल. एकत्र आणण्याची क्षमता एक भाग आहे आणि ज्या व्यक्तीवर नेतृत्व देण्याची जबाबदारी टाकू त्याच्या नेतृत्वाची क्षमता असणे हे महत्त्वाचे आहे.'
आज जी विरोधी पक्षाची परिस्थिती झाली आहे, त्याला आपण जबाबदार आहात असं वाटत नाही का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, 'आम्ही सगळेच यासाठी जबाबदार आहोत. योग्य वेळ जेव्हा येईल, तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे आणि ती वेळ फार लांब नाही. संसदेचं अधिवेशन लवकरच येत आहे. त्यावेळी एकत्र येण्याची चर्चा करण्याची संधी आम्हाला मिळणार आहे.'