मुंबई, 12 मे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात आता तिसरा लॉकडाउनचा टप्पा आता संपुष्टात येणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. परंतु, 'लॉक डाऊननंतर होणारी उपासमारी, आर्थिक दुरावस्था यामुळे घरांत, रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी मुडदे पडू नयेत म्हणून राज्यकर्त्यांनीही ‘कोरोना’चे भजन थांबवायला हवे. सरकारने आधी कोरोनाच्या तिरडीवरून उठावे. लोक आपोआप कामधंद्याला लागतील! ‘लॉक डाऊन’नंतर सरकारकडे काय योजना आहे? असा थेट सवाल शिवसेनेनं विचारला आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या 'लॉक डाऊननंतर काय? कोरोनाच्या तिरडीवरून उठा!!' या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आला. 'लॉक डाऊननंतर सरकारकडे काय योजना आहे? असा प्रश्न राहुल गांधींपासून अनेक प्रमुख नेत्यांनी विचारला आहे. या घडीला तोच प्रश्न महत्त्वाचा असून सरकारकडे त्यावर उत्तरही नाही आणि उताराही दिसत नाही. लॉक डाऊन काढायचा की वाढवायचा? याचा निकाल काहीही लागला तरी दोन्ही बाजूला मरण हे जनतेचेच आहे. एक मात्र नक्की, कोरोनाच्या तिरडीवरून आता उठायला हवे. कामधंद्याला लागायला हवे. केंद्र सरकारने आता स्पष्ट केले आहे की, कोविड म्हणजे कोरोनापासून संरक्षण आवश्यक आहे, पण आता कामधंदे सुरू व्हायलाच हवेत. आर्थिक उलाढाल होणे गरजेचे आहे. तसे झाले नाही तर कोसळून पडलेली अर्थव्यवस्था साफ रसातळाला जाईल, अशी भीती सेनेनं व्यक्त केली आहे.
हेही वाचा - धक्कादायक! कॅन्सरनं घेतला आणखी एक जीव, क्राइम पेट्रोलच्या अभिनेत्याचं निधन
'मध्यमवर्गीय कालपर्यंत रेशन दुकानाच्या रांगेत उभा राहत नव्हता. त्यातील अनेकजण आता मोफत मिळणार्या धान्यवाटपाच्या मेहेरबानीवर जगत असल्याचे चित्र विदारक आहे. काम करणारे हात रिकामे आहेत आणि कोरोनाच्या तीन महिन्यांत सरकारला जो महसूल मिळाला तो कोरोनाच्या लढाईतच खर्च झाला. त्यामुळे सरकारची तिजोरीही तशी रिकामीच असल्याने लॉक डाऊननंतर करायचे काय? हा प्रश्न त्यांच्या समोरही आहेच. देशभरातील सर्व उद्योगधंदे कधी सुरू होतील ते अनिश्चित आहे', असं म्हणत उद्योग धंदे सुरू करावी अशी मागणी सेनेनं केली आहे.
'कोरोनाच्या लॉक डाऊनमुळे या सगळय़ा उद्योगांना खिळ बसली आहे. त्याचा परिणाम रोजगारावर होत आहे. याशिवाय असंघटीत क्षेत्रात काम करणारा वर्ग प्रचंड आहे. पंचतारांकीत व मध्यम आकाराची हॉटेल्स, त्यावर अवलंबून असलेला ‘वाहतूक व पर्यटन’ व्यवसाय मोडून पडला आहे. रस्त्यावरचे खाद्य स्टॉल्स, किरकोळ विक्रेते, रिक्षावाले यांचे भविष्य अधांतरी आहे. घरेलू कामगारांची अवस्था त्याहून बिकट आहे. या वर्गास कोणीच वाली नाही. घरकाम करणार्या ‘बाया’ झोपड्या किंवा चाळीत राहतात. त्यांना आता इतर निवासी संकुलात प्रवेश बंदी आहे व त्यांनी कितीकाळ मोफत धान्याच्या रांगेत उभे राहायचे? असा सवालही उपस्थितीत करण्यात आला आहे.
हेही वाचा - 36 दिवसांनी वुहानमध्ये कोरोनाची एण्ट्री, लक्षणं नाही तरी रिपोर्ट पॉझिटिव्ह
'मोदींचे व महाराष्ट्राचे सरकार खंबीर आहे वगैरे ठीक, पण जनतेचा धीर सुटणार नाही याची काळजी सरकारला घ्यावी लागेल. अन्यथा लोकांच्या संतापाला तोंड देणे कठीण होईल. लोकांना आजच जगायचे आहे. त्यांना उद्याचा हवाला नको. ‘आता कशाला उद्याची बात, बग उडूनि चालली रात’, अशी अवस्था सगळ्यांचीच झाली आहे, त्यामुळे लोकांना आता जगायचं आहे, असा सल्लावजा टोलाही या लेखातून सरकारला लगावण्यात आला.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.