जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / अजित पवारांच्या निर्णयानंतर पिंपरी चिंचवडमध्ये झळकली अशी पोस्टर्स

अजित पवारांच्या निर्णयानंतर पिंपरी चिंचवडमध्ये झळकली अशी पोस्टर्स

अजित पवारांच्या निर्णयानंतर पिंपरी चिंचवडमध्ये झळकली अशी पोस्टर्स

फ्लेक्स लावून कुणी पवारसाहेब किंवा अजित पवारांचे समर्थन करत असेल तर हा त्यांचा वयक्तिक विचार असून आपणही सध्या वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत…

  • -MIN READ
  • Last Updated :

गोविंद वाकडे,(प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड,24 नोव्हेंबर: महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठी उलथापालथ झाली. शिवसेना आणि काँग्रेसला डावलून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने सत्ता स्थापन केली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर अजित पवार एकटे पडतील, असे वाटत असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या समर्थनार्थ पोस्टर्स झळकली आहेत. अजित पवार यांच्या निर्णयाचे समर्थकांकडून स्वागत करण्यात आले आहे. या स्वागताचे पोस्टर्स आता संपूर्ण शहरात झळकायला सुरुवात झाली आहे. खरंतर हे राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या उभ्या फुटीचंही दर्शन म्हणावे लागेल. पक्षांतर्गत वाढत चाललेला रोष शमवण्यासाठी स्वतः अजित पवारांनीच आपल्या समर्थकांना अशी पोस्टरबाजी करण्याचा सल्ला दिला असेल का, अशीही चर्चा सध्या सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी शहरभर अशी फ्लेक्सबाजी केली आहे. अजित पवारांचे नेतृत्त्व आणि निर्णय मान्य केल्याचे संदेश देण्याचा प्रयत्न समर्थनांनी केला आहे. दरम्यान, या पोस्टरबाजीबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना विचारले असता, याबाबत आपल्याला काहीही माहीत नसल्याचे सांगितले. फ्लेक्स लावून कुणी पवारसाहेब किंवा अजित पवारांचे समर्थन करत असेल तर हा त्यांचा वयक्तिक विचार असून आपणही सध्या वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेतच असल्याचे सांगून वाघेरे यांनी या प्रकरणातून अंग झटकले आहे.

महाराष्ट्रात मोठी उलथापालथ मुंबईतील राजभवनात शनिवारी सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ दिली. महाराष्ट्राच्या राजकारणात एका रात्री मोठी उलथापालथ झाली. सत्तासंघर्ष सोडवण्यासाठी महाविकासआघाडीकडून सातत्यानं बैठकांचा सिलसिला सुरू होता. आज चर्चा अंतिम टप्प्यात येणार असल्याची चर्चाही होती. अखेरच्या टप्प्यात सगळं ठरत असताना मात्र अचानक राजकीय भूकंप आला आणि थेट राजभवनात मुख्ममंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. महाविकासआघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार होती मात्र त्याआधीच शनिवारी शपथविधीसोहळा पार पडल्यानं अनेक सवालही उपस्थित होत आहेत. महिन्याभरापासून सुरु असलेला सत्तसंघर्षाचा तिढा अखेर सुटला आणि एक वेगळे समीकरण समोर आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात