Home /News /mumbai /

योगी सरकारने आपल्याच लेकरांना संकटकाळी लाथाडले, शिवसेनेचं टीकास्त्र

योगी सरकारने आपल्याच लेकरांना संकटकाळी लाथाडले, शिवसेनेचं टीकास्त्र

'सीमेवरूनच परत जा, अशी अरेरावी त्या त्या राज्यांनी केली हे बेईमानीचेच लक्षण म्हणावे लागेल. पालघरमधील साधू हत्याकांडाइतकाच हा प्रकार निर्घृण आणि अमानुष आहे'

    मुंबई, 06 मे : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आलं होतं.  त्यामुळे वेगवेगळ्या राज्यात लाखो मजूर अडकले होते. अखेर या मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यास मुभा मिळाली आहे. परंतु, या मजुरांना आपल्याच राज्यात न घेण्याच्या निर्णयावरून शिवसेनेनं योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर सडकून टीका केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'त 'सीमेवरून परत जा! व्होट बँकेचा कचरा झाला!!' या शिर्षकाखाली आजचा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला. या अग्रलेखातून  पुन्हा एकदा भाजप सरकारवर टीका करण्यात आली आहे. मजुरांच्या स्थलातरांच्या प्रश्नावरून सेनेनं योगी आदित्यनाथ सरकारवर टीकेचा आसूड ओढला आहे. हेही वाचा - विधान परिषदेवरून महाविकासआघाडीत नवा पेच, सेना-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार? 'उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, आंध्र अशा राज्यांतला मजूरवर्ग देशात पसरलेला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातेत तो सर्वाधिक आहे. कालपर्यंत हा मजूरवर्ग म्हणजे अनेक राजकीय पक्ष व पुढार्‍यांची ‘व्होट बँक’ बनली होती व जणू मुंबई-महाराष्ट्र यांच्याच श्रमातून उभा राहिला अशी बतावणी सुरू होती. आता या मुंबईचे उपरे मालक संकटकाळी पलायन करीत आहेत व त्यांचे राजकीय मालक-पालक तोंडात मास्कचे बोळे कोंबून घरातच बसले आहेत. या श्रमिकांना आता कोणीच वाली उरलेला दिसत नाही. आज या हिंदी भाषिकांसाठी त्यांच्या राज्याचे दरवाजे बंद केले गेले आहेत. सीमेवरूनच परत जा, अशी अरेरावी त्या त्या राज्यांनी केली हे बेईमानीचेच लक्षण म्हणावे लागेल. पालघरमधील साधू हत्याकांडाइतकाच हा प्रकार निर्घृण आणि अमानुष आहे' अशा शब्दात सेनेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'योगी सरकारने आपल्याच लेकरांना संकटकाळी लाथाडले' उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने स्थलांतरित मजुरांबाबत जो ‘यू टर्न’  घेतला आहे तो माणुसकीस धरून नाही. आपल्याच लोकांशी असे क्रूरपणे वागणे कोणालाच शोभत नाही. सोप्या मराठी भाषेत त्यास बगला वर करणे म्हणतात व उत्तर प्रदेश प्रशासनाने अशा बगला वर केल्याने 30-35 लाख हिंदी मजूरवर्गाच्या जीवाची तडफड सुरू आहे.   लाखो लोकांनी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी झुंबड उडवली आहे. पण या लाखो श्रमिकांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री स्वगृही घ्यायला तयार नाहीत. या सर्व श्रमिकांच्या कोरोना चाचण्या करा आणि नंतरच त्यांना पाठवा, अशी आडमुठी भूमिका घेऊन योगी सरकारने आपल्याच लेकरांना संकटकाळी लाथाडले आहे. इतर हिंदी भाषिक राज्यांनीही अशीच भूमिका घेतल्याने फक्त महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांवर नव्याने सुलतानी संकट कोसळले आहे, अशी थेट टीका सेनेनं केली आहे. हेही वाचा - 26/11 हल्ल्यात कसाबला शिक्षा देणारे मुख्य साक्षीदार सापडले मुंबईच्या रस्त्यावर 'मजुरांसाठी काँग्रेसच्या भूमिकेनंतर अनेकांना मळमळ' 'योगी असतील नाहीतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार,त्यांना आपल्याच लोकांच्या बाबतीत असे निर्घृणपणे वागता येणार नाही. पुन्हा या सरकारांचा गरीब –  श्रीमंत हा भेदभाव कसा तो पहा. याच योगी सरकारने राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना आणण्यास शेकडो बस पाठवल्या व त्यांना विनाचाचण्या आणण्यात आले. कारण ही श्रीमंतांची मुले होती, पण मजूरवर्गास मात्र कोणी वाली नाही. हा मजूरवर्ग आपल्या गृहराज्यात न आलेलाच बरा या भावनेतून अटी-शर्ती टाकल्या जात आहेत.  श्रमिकांना आणायचे कसे? त्यांच्या रेल्वे, बसेसची तिकिटे काढायची कोणी? हा मोठा प्रश्न गाजू लागला.  अशावेळी सोनिया गांधी या माणुसकीच्या नात्याने पुढे आल्या व त्यांनी आपापल्या राज्यांत जाऊ इच्छिणार्‍या श्रमिकांच्या गाडी-भाडय़ाचा भार काँगेस पक्ष सोसेल, असे जाहीर करताच अनेकांना मळमळ सुरू झाली,' असं म्हणत भाजप नेते आणि टीकाकरांना फटकारून काढले आहे. 'गडकरी बोलले ते योग्यच' 'या श्रमिकांना आता कोणीच वाली उरलेला दिसत नाही. मुंबईसह इतर भागांतील हिंदी भाषिक मतपेढ्यांत प्रचारासाठी अनेकदा उत्तरेचे मुख्यमंत्री आले आहेत. हिंदी भाषिक इतर नेते घुसले आहेत, पण आज या हिंदी भाषिकांसाठी त्यांच्या राज्याचे दरवाजे बंद केले गेले आहेत.  दोन देशांत असे करार-मदार होऊ शकतात, पण एकाच देशातील दोन राज्यांत हे प्रकार घडू नयेत. हे श्रमिक म्हणजे भटकी कुत्री-मांजरी नव्हेत. त्यांना किमान माणुसकी दाखवायला त्यांची मातृराज्ये तयार नाहीत. शेवटी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पलायनवादी मजुरांना सांगितले तेच खरे, ‘‘महाराष्ट्रातून पळून जाल, पण तुमच्या राज्यात जाऊन काय खाल?’’ खायचे तर सोडाच, पण तुमचे राज्य तुम्हाला आतमध्येच येऊ देत नाही,' असं म्हणत भाजपला टोला लगावला आहे.  संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Samana, UP, Workers, Yogi adityanath

    पुढील बातम्या