मुंबई, 27 जुलै : राष्ट्रवादीचे (ncp) शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (amol kolhe) यांनी कामाचा धडाका लावला आहे. आपल्या मतदारसंघात एकापाठोपाठ विकास कामाला सुरुवात केली आहे. आताही गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नगर रस्त्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आता त्यांनी निकाली लावला आहे. याबद्दल अमोल कोल्हे यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे (nitin gadkari) आभार मानले आहे.
अमोल कोल्हे यांनी ट्वीट करून शिरुर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना दिलासादायक बातमी दिली आहे.'नगर रस्त्याच्या वाहतूक कोंडीचा मार्ग आता मोकळा होणार आहे. पुणे-शिरुर दरम्यान दुमजली पुलाचा एलिव्हेटेड कॉरीडॉर (६७ कि.मी) व चाकण-शिक्रापूर चौपदरीकरणासाठीचे काम लवकरच पूर्ण होत असून यासाठीचा निधी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मंजूर केला आहे' अशी माहिती कोल्हे यांनी दिली.
आपल्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील नगर रस्त्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघत आहे. पुणे-शिरुर दरम्यान दुमजली पुलाचा एलिव्हेटेड कॉरीडॉर (६७ कि.मी) व चाकण-शिक्रापूर चौपदरीकरणासाठीचे काम लवकरच पुर्ण होत असून यासाठीचा निधी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मंजूर केला. pic.twitter.com/hbM5qHTOXp
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 27, 2021
केंद्र सरकारने या दोन्ही कामांसाठी सुमारे ८२१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून यातील सुमारे ७ हजार २०० कोटी रुपये पुणे शिरुर दरम्यानच्या दुमजली एलिव्हेटेड कॉरीडॉरसाठी तर १ हजार १५ कोटी रुपये तळेगाव-चाकण-शिक्रापूर दरम्यानच्या चौपदरीकरणासाठी मंजूर करण्यात आले आहेत, असंही कोल्हे यांनी सांगितलं.
तसंच, पुणे शिरूर रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्यासाठी रु. २० कोटी मंजूर केले असून अगदी उद्यापासून म्हणजे बुधवारी (दि.२८ जुलै) सल्लागार (कन्सल्टंट) नेमणुकीची निविदा प्रक्रिया सुरू होत आहे. या रस्त्याचे काम लवकरच सुरू होऊन ते वेगाने पूर्ण होईल हा विश्वास आहे, असंही कोल्हे म्हणाले.
इस्रायल-पॅलेस्टाईन वादाचे पडसाद ऑलिम्पिकमध्येही; इस्रायलविरुद्ध खेळण्यास नकार
त्याचबरोबर, 'आपल्या भागातील पायाभूत विकासाच्या दृष्टीने हा निधी अतिशय महत्वाचा असून या भागातील दळवळण यामुळे गतीमान होणार आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांचे मनापासून आभार' अशा शब्दांत कोल्हे यांनी गडकरींचे आभार व्यक्त केले.
केंद्रीय मंत्री मा.नितीनजी गडकरी (@nitin_gadkari) यांची नवी दिल्लीे येथे सदिच्छा भेट घेतली. केंद्र सरकारने पुणे शिरुर रस्त्यावर दुमजली फ्लायओव्हर व तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता चौपदरीकरण यासाठी एकूण ८ हजार २१५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. pic.twitter.com/n9LNZdUVJr
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 27, 2021
'या रस्त्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील,खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड विधानसभा मतदारसंघाचे आ. दिलीपराव मोहीते पाटील व शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे आ अॅड.अशोकबापू पवार यांच्यासोबत सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून लोकसभा निवडणुकीच्या काळात जनतेला दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल पडले याचा आनंद आहे, अशी भावनाही कोल्हे यांनी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.