मुंबई, 23 जुलै : राज्यात कोरोनाच (corona) गंभीर संकट सुरूच आहे. त्यात गेल्या दोन वर्षात नैसर्गिक आपत्तीची मालिका सुरूच आहे. या आपत्तीत हजारो कोटींचा नुकसान झालं. विशेष म्हणजे, दोन मोठ्या नैसर्गिक आपत्तीचं केंद्रीय पथकाकडून सर्व्हे झाले पण केंद्र सरकारकडून (modi government) अजूनही मदत (Disaster Fund) मिळाली नाही, अशी धक्कादायक बाबसमोर आली आहे.
देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाची तीव्रता अधिक होती. दोन लाटेमध्ये अतोनात नुकसान सहन केल्यानंतर राज्य आता कसेबसे सावरले आहे. पण कोरोनाचे गंभीर संकट अजूनही टळलेले नाही. अशा परिस्थितीत जानेवारी 2020 मध्ये झालेली गारपीट, जून 2020 निसर्ग चक्रीवादळ , ऑगस्ट 2020 विदर्भातील पूर परिस्थिती, ऑक्टोबरमध्ये 2020 अतिवृष्टी आणि 2021 मध्ये आलेले तौक्ते चक्रीवादळ अशी संकटाची मालिका सुरूच आहे. या नैसर्गिक आपत्तीत हजारो कोटी रुपयांची हानी झाली. आता कोकणासह मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे.
देशात आलेल्या नैसर्गिक आपत्ती केंद्र आणि स्थानिक राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. महाराष्ट्राने 2 वर्षात केंद्र सरकारकडे आठ हजार कोटींची मागणी केली आहे. यामध्ये 2020 मध्ये झालेल्या गारपीटीमुळे नुकसानीसाठी 93 कोटींची मागणी केली होती. पण केंद्राकडून हा निधी मिळालाच नाही. त्यानंतर निसर्ग चक्रीवादळाने कोकण आणि रायगडमध्ये हाहाकार माजवला होता. यामुळे कोकणाच्या पट्ट्यात मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसानीसाठी 1065 कोटी मागितले होते. पण केंद्र सरकारने दिले केवळ 268 कोटी. विदर्भातील पूर परिस्थितीसाठी 900 कोटी मागितले होते. पण केंद्र सरकारने फक्त 151 कोटी मदत दिली होती. 2020 च्या अतिवृष्टीसाठी 3721 कोटी मागितले होते. पण केंद्रीय पथक येऊन गेले, पाहणी केली पण मदत दिली नाही. त्यानंतर तौक्ते चक्रीवादळासाठी 203 कोटी मदत मागितली होती. पण, याही वेळी केंद्रीय पथक आले पण मदत मिळाली नाही.
'जर राज्याने मागितलेल्या निकषानुसार मदत निधी नसेल तर निदान केंद्राच्या निकषावर असलेली तरी मदत द्यावी, अशी मागणीच मदत पुनर्वसन मंत्री विजय वेदट्टीवार यांनी केली आहे.
तौक्ते चक्रीवादळ बरोबरच्या काळात संकट केवळ महाराष्ट्रात नव्हतं, तर या वादळाचा तडाखा बसला गुजरातला बसला होता. पण गुजरातला मदत मिळाली 1 हजार कोटी, बंगालला मदत मिळाली 2 हजार 707 कोटी, मध्यप्रदेश 611 कोटी आणि कर्नाटकला मदत मिळाली 511 कोटी, पण महाराष्ट्राला मदत अजून पोहोचलीच नाही.
राज्यात पुन्हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र अभूतपूर्व संकटात सापडला आहे. केंद्र आणि राज्यची मदत मिळो न मिळो अशा परिस्थितीत उर्वरित महाराष्ट्रच्या जनतेने कोकणच्या पाठीशी उभ राहावं हीच अपेक्षा.
राज्य सरकारने केंद्राकडे किती मदत मागितली?- 2020 गारपिटीसाठी 93 कोटी मागणी, केंद्राकडून निधी नाही.- निसर्ग चक्रीवादळ 1065 कोटी मागणी, केंद्र सरकारने दिले केवळ 268 कोटी- विदर्भातील पुरासाठी 900 कोटी मागणी, केंद्र सरकारने दिले 151 कोटी- 2020 च्या अतिवृष्टीसाठी 3721 कोटी मागणी, केंद्रीय पथक येऊन मदत नाही. - तौक्ते चक्रीवादळ 203 कोटी मागणी, केंद्रीय पथक आले मदत नाही
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.