नालासोपारा, 22 जुलै : मुंबईत कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे लॉकडाउनची परिस्थिती कायम आहे. पण, गेल्या चार महिन्यांपासून घरात अडकून पडलेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले आहे. आज अखेर चाकरमान्यांचा बांध अखेर फुटला आणि मुंबई लोकल सुरू करा, या मागणीसाठी नालासोपाऱ्यात रेल्वे रोको करण्यात आला.
लॉकडाउनमुळे मुंबईतील लोकल वाहतूक ठप्प आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून मोजक्याच प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू आहे. त्यामुळे चाकरमान्यांना एसटी बस आणि खासगी गाड्याने प्रवास करावा लागत आहे. पण, एसटी बसेसची व्यवस्था अपुरी असल्यामुळे आज चाकरमान्यांच्या संतापाचा अखेर उद्रेक झाला.
शेकडो प्रवाशांनी आधी नालासोपारा एसटी स्टँडमध्ये जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. पण त्यानंतर चाकरमान्यांनी थेट नालासोपारा रेल्वे स्थानकात घुसून आंदोलन केले. पहाटे सहावाजेपासून चाकरमान्यांनी आंदोलन पुकारले होते. त्यानंतर हळूहळू चाकरमान्यांची संख्या वाढत गेली.
चाकरमान्यांनी रेल्वे रुळावर उतरून रेल्वे सुरू करावी, अशी मागणी केली आहे. या आंदोलनामुळे एकच गोंधळ उडाला. शेकडो प्रवासी रेल्वे स्थानकावर घुसल्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. चाकरमान्यांनी रुळावर उतरून ठिय्या मांडला.
शेकडो प्रवाशी रुळावर उतरल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. चाकरमान्यांनी आंदोलन करत सोशल डिस्टंसिंगचा पार फज्जा उडवला. घटनास्ठळी पोलिसांची जास्त कुमक पोहोचली असून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
एसटी बसेस जास्त सोडण्याचे आवाहन
दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांपासून नालासोपारा एसटी डेपोमध्ये एसटी बस कमी सोडत असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अखेर आज आंदोलनानंतर एसटी प्रशासनाने जास्त बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून प्रवाशांना जास्तीत जास्त बस सोडण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.