मुंबई, 27 फेब्रुवारी : राज्याच्या मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अतिरिक्त सचिवपदाची धुरा मनुकुमार श्रीवास्तव यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
सीताराम कुंटे हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून प्रशासनावर त्यांची मोठी पकड आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत.
महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव संजीव कुमार येत्या 28 तारखेला निवृत्त होत आहेत. त्यामुळे रिक्त झालेल्या मुख्य सचिवपदावर कुणाची वर्णी लागते याची चर्चा सध्या मंत्रालय आणि प्रशासनात होती. अखेर या पदासाठी राज्याचे मुख्य सचिव म्हणून गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
हेही वाचा - पुण्यातल्या सामन्यांना हिरवा कंदील; पण मुख्यमंत्री ठाकरेंची मोठी अट
मुख्य सचिव पदासाठी कुंटे यांच्या बरोबर प्रवीणसिंह परदेशी यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा होती. मात्र प्रवीणसिंह परदेशी मुंबई महापालिका आयुक्त पदावर असताना त्यांचे राज्याचे मुख्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फारसे न जमल्याने तसंच परदेशी हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे अतिशय निकटवर्तीय आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव राहिल्याने परदेशी यांच्यापेक्षा कुंटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, प्रवीणसिंह परदेशी यांच्याकडे एमएमआरडीए व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्याची चर्चा देखील सध्या वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याची माहिती आहे.