मुंबई, 06 जुलै: मुंबई अंडरवर्ल्डचा कणा मोडणारे पहिले इनकांऊटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्या 'मी अगेन्स्ट द मुंबई अंडरवर्ल्ड' या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारचा ठाकरी भाषेत समाचार घेतला. 'अलीकडे देशात 56 इंचाच्या छातीची फार चर्चा आहे. पण 56 इंचाच्या छातीपेक्षा त्या छातीवर किती मेडल्स आहेत त्याला महत्त्व आहे. मी इथे आलोय ते इसाकभाई आणि पोलिस दलाला मानाचा मुजरा करण्यासाठी. मुंबईकरांच्या कुटुंबाची काळजी घेणाऱ्या मुंबई पोलिसांच्या कुटुंबाची काळजी कोणचं घेत नाही. पण शिवसेना मात्र त्यांच्यासाठी नेहमीच उभी राहणार. आपल्या कर्तव्यासाठी जे आपल्या प्राणांची आहुती द्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत ते खरे हिरो. त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानावर सिनेमा यायला हवा,' अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
महानिरीक्षक खलीद यांनीही इसाक बागवानबद्दलचे आपले मत व्यक्त केले. 'कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला सहजासहजी शौर्यपदक मिळत नाही. त्यातही एकाच पोलीस अधिकाऱ्याला तीन वेळा शौर्यपदक मिळाले असेल तर त्यामागे त्याची चिकाटी, जिद्द आणि प्रतिकूल परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक असते. बागवानकडे या साऱ्या गोष्टी आहेत. प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याच्या करिअरमध्ये असा एक वेळ येतो जेव्हा त्याला प्रलोभनं दिली जातात. वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकले जातात. यात अनेकांचे धैर्य खचते, पण या वाईट प्रसंगांचाही बागवान यांनी धीराने सामना केला.'
या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत उपस्थित होते. बागवानबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'आतापर्यंत बारामतीचे बागवान आणि शरद पवार या दोनच व्यक्ती दिल्लीमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. 56 इंचाची छाती म्हणजे नक्की काय हे बागवान यांच्याकडे पाहून मिळते. भुजबळ विरोधी पक्षनेते झाले तेव्हा शिवसैनिकांनी त्यांच्या बंगल्यावर हल्ला चढवला होता. त्यावेळी बागवान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा हल्ला रोखला. ते जर तिकडे नसते तर आज इतिहास काही वेगळाच असता,' अशी मिश्किल प्रतिक्रिया राऊत यांनी यावेळी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Isaque bagwan, Narendra modi, Sanjay raut, Shivsena, Uddhav thackeray