धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 10 मार्च : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक भारतीयाचं दैवत आहे. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला महाराज नेहमी प्रेरणा देतात. आज (10 मार्च) रोजी संपूर्ण देशभरात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्तानं शिवाजी महाराजांचा प्रत्येक भक्त त्यांना आपल्या पद्धतीनं आदरांजली अर्पण करतो. मुंबईतील एका तरुणानंही कलेच्या माध्यमातून महाराजांना मुजरा केला आहे. त्यानं चक्क तांदळाच्या दाण्याचा वापर करत ही कलाकृती साकरली आहे.
काय आहे संकल्पना?
मुंबईतील मालाड मालवणी परिसरात राहणाऱ्या विवेक वाघ या तरुणाने 4 किलो तांदळापासून तब्बल 50 तासात छत्रपती शिवाजी महाराजांची 4×4 या आकाराची कलाकृती साकारली आहे. विवेकनं सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स या विद्यालयातून कलेच शिक्षण पूर्ण केलं आहे. गेल्या 12 वर्षापासून तो या क्षेत्रात कार्यरत आहे.
विवेक विविध प्रकारची चित्र रेखाटत असतो. गेल्या चार वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त विविध माध्यमांतून आपल्या कलेच्या माध्यमातून महाराजांना आदरांजली अर्पण करण्याचा प्रयत्न विवेक करतो. त्यानं आतापर्यंत सुपारीवर, पेंटिंग ब्रशवर, महाराजांना साकारलं आहे.
विदेशी कलाकारांनीही केला शिवाजी महाराजांचा जयजयकार, पाहा Photos
विवेकनं यंदाच्या कल्पनेविषयी बोलताना सांगितलं की, ' मी गेल्या चार वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांना विविध प्रकारे आदरांजली कलेतून अर्पण करतो. यंदा काय करावं सुचत नव्हतं. वेगळं काही तरी करायचं असाच नेहमी मनात विचार येत होता.
माझ्या बायकोने मला ही संकल्पना सांगितली. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी मी काम सुरू केलं. तब्बल 50 ते 55 तास ही कलाकृती साकारण्यासाठी लागले. सुरुवातीला तांदळाला हवं त्या रंगाच्या शेड मध्ये भाजून घेतलं. त्यानंतर महाराजांच्या सर्वात जुन्या छायाचित्राच्या आधारावर ही कलाकृती बनवली.'
सोलापूरकरांचा राजांना मुजरा, पाळणा कार्यक्रमात अवतरला शिवकाळ! Video
लाडू भाजताना कल्पना सुचली
विवेकच्या पत्नी वर्षा नायर यांनीही या कामात त्याला पूर्ण मदत केली आहे. वर्षा या मुळच्या दक्षिण भारतीय कुटुंबातील आहेत. त्यांच्या माहेरी तांदळाचे लाडू बनवले जाता. त्यांनी आईला लाडवासाठी तांदूळ भाजताना पाहिलं. त्यावेळी त्यांना ही कल्पना सुचली. मी त्याबाबत विवेकला सांगितलं.
'आम्ही सुरुवातीला हवा तो रंग आणि शेड येईपर्यंत तांदूळ भाजले. त्यानंतर ही कलाकृती साकारली. छत्रपती शिवाजी महाराज हे शंकराचा अवतार आहेत, अशी आमची श्रद्धा आहे. आम्ही या कलाकृतीला शंकराच्या अवतारात रुपांतर करण्याचा प्रयत्न करणार आहोत,' असं वर्षा यांनी यावेळी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chatrapati shivaji maharaj, Chatrapati Shivaji Maharaj Jayanti, Local18, Mumbai