अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभरात उत्साहानं साजरी होत आहे. महाराष्ट्रात तर या निमित्तानं सर्वत्र उत्साहाला उधाण आलं आहे. सोलापूरमध्ये मध्यरात्री शिवजयंतीचा उत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या कार्यक्रमाला सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. नयनरम्य पाळणा सोहळा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा….! शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे…. झुलवा पाळणा बाळ शिवाजींचा ..! या सारख्या गीतींनी यावेळी सर्व आसमंत दुमदुमले. वीरमाता, वीरपत्नी आणि वीरकन्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सोलापुरात जणू शिवकाळच अवतरला होता. सोलापूर शहरात शनिवारी दि.18 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजल्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवभक्तांची गर्दी जमली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारुढ पुतळ्यास शिवनेरी किल्याचे ऐतिहासिक असे शिवकालीन रुप देण्यात आले होते. संपूर्ण पुतळ्याच्या परिसराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. पुतळ्याच्या समोरच राजमाता जिजाऊंचा पुतळा आणि पाळणा सजवण्यात आला होता. त्यात बाळशिवबांची मूर्ती ठेवण्यात आली होती. या स्फूर्तीदायी आणि ऊर्जादायी पाळणा गीताने उपस्थित हजारो शिवभक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. माझ्या राजाची जयंती आली..! शिवजयंतीनिमित्त WhatsApp स्टेटसला ठेवा सुंदर शुभेच्छा संदेश सोलापूरकरांचा जल्लोष गुलाब फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव, फटाक्यांची मनोहारी, नयनरम्य आतषबाजीने आकाश प्रकाशित झाले होते. यावेळी एकमेकांना मिठाई देऊन श्री शिवजन्मोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यात आला. लॉकडाऊननंतर सोलापुरात पहिल्यांदाच अशाप्रकारचा भव्यदिव्य दिमाखदार असा सोहळा पार पडला. हाती भगवा झेंडा घेऊन शिवप्रेमी सहभागी झाले होते. “तुमचं आमचं नातं काय: जय जिजाऊ ,जय शिवराय”, “शिवाजी महाराज की जय " या सारख्या वेगवेगळ्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. बाल मावळ्यांनी शिवकालीन वेशभूषेत तलवारबाजीसह मर्दानी खेळ सादर केले. सर्व जाती-धर्माचे मावळे आणि महिला भगिनी या सोहळ्याला उपस्थित असल्याने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन या निमित्ताने घडले. नाशिकमध्ये साकारलीय शिवरायांची 61 फूट भव्य मूर्ती, पाहा डोळ्यांचं पारणं फेडणारा पुतळा Video दोन वर्षांच्या खंडानंतर अशाप्रकारचा सोहळा पार पडत असल्याने सर्वच समाजातील आबालवृद्ध शिवप्रेमी यावेळी हजारो संख्येने उपस्थित होते. शानदार असा सोहळा असंख्य शिवप्रेमींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.