शरद पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील प्रयोग आता देशातही होणार? शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

शरद पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील प्रयोग आता देशातही होणार? शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

यूपीए अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा राजधानी दिल्लीतील राजकीय वर्तुळात आहे.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : यूपीएच्या अध्यक्षपदी शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांचं आजारपण बघता त्या लवकर निवृत्त होतील. त्यामुळे यूपीए अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा राजधानी दिल्लीतील राजकीय वर्तुळात आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

'शरद पवारांना आमच्या शुभेच्छा आहेत. महाराष्ट्रातील घडामोडींचं नेतृत्व पवारांनी केलं. राष्ट्राचे नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या कुणामध्ये असेल तर ती शरद पवार साहेबांकडे आहे. मात्र भविष्यात राष्ट्रीय राजकारणात काय होईल हे मी सांगू शकत नाही,' असं शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

'महाराष्ट्रामध्ये आम्ही टक्कर देतो आहोत. देशभरातील विरोधकांची इच्छा आहे महाराष्ट्रातील प्रयोग भविष्यात देशपातळीवर करता येईल का, याबाबत चर्चा आहे. महाराष्ट्रात प्रयोग झाला असल्यामुळे अनेकांना अपेक्षा आहेत,' असं म्हणत संजय राऊत यांनी देशपातळीवर भाजपविरोधात होणाऱ्या संभाव्य आघाडीबद्दल भाष्य केलं आहे.

शरद पवार दिल्लीत धडकणार? अजित पवार म्हणाले....

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केंद्रीय पातळीवर सुरू असलेल्या चर्चेबद्दल राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 'पवार साहेब दिल्लीत गेले की अशा बातम्या येतात. साहेब मुख्यमंत्री असताना अनेक नेत्यांशी सबंध आले होते. आता शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. अजून तर माझ्या कानावर काही नाही. उद्या पवार साहेब यांचा वाढदिवस आहे तो शांततेत करण्याचा प्रयत्न आहे,' असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या यूपीए अध्यक्षपदाच्या चर्चेबाबत स्पष्ट संकेत देणं टाळलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 10, 2020, 5:05 PM IST

ताज्या बातम्या