मुंबई, 02 मे : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूंकप घडवला. अचानक पवारांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं. ‘मी माझा निर्णय घेतला आहे, मला यावर विचार करण्यासाठी 2 ते 3 दिवस द्या, असा निरोप साहेबांना दिला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली. तसंच सिल्व्हर ओक बंगल्याहून सर्व कार्यकर्त्यांना परत आपल्या घरी जाण्याचे आवाहन केले आहे. ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. दुपारी पवारांच्या निवास्थानी अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांनी भेट घेऊन समजूत काढली.
'राजीनाम्याबाबत दोन-तीन दिवसात निर्णय घेऊ', शरद पवारांचा संदेश अजितदादांनी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला#SharadPawar #NCP pic.twitter.com/gXX4tZB9Kp
— News18Lokmat (@News18lokmat) May 2, 2023
‘कार्यकर्ते भावनिक झाले, पवार साहेब सिल्व्हर ओकला गेले तरी कार्यकर्ते उठायला तयार नव्हते. मग आम्हीही सिल्व्हर ओकला गेलो. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवार साहेबांना कार्यकर्त्यांचं म्हणणं सांगितलं. पवार साहेबांनी सगळं ऐकून घेतलं. मला त्याबद्दल विचार करण्याकरता दोन-तीन दिवसांमध्ये करतो आणि मग माझी भूमिका स्पष्ट सांगतो. तोपर्यंत इथल्या कार्यकर्त्यांनी उठलं पाहिजे आणि जेवण केलं पाहिजे, असं अजितदादांनी सांगितलं.
मी त्यांचं ऐकण्याचा विचार करतो तेव्हा त्यांनीही माझं ऐकावं. काही जणांनी राजीनामे दिले असं जाहीर केलं. कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊ नये, असं पवार साहेबांनी सांगितलं, असंही अजित पवार म्हणाले.