मुंबई, २० मे -राज्यसभा निवडणुकीसाठी (rajya sabha election 2022) जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीराजे यांना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑफर दिली आहे. पण, त्यांनी अजूनही ऑफर स्वीकारली नाही.तर 'संभाजीराजे यांचा आदरच आहे, पण शिवसेनेने ही जागा का लढवू नये. त्या जागेवर कोणाची मालकी नाही', असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची स्पष्ट भूमिका मांडली.
संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी पाठिंबा मिळावा म्हणून सर्वच पक्षांना आव्हान केले आहे. राष्ट्रवादीनेही त्यांना पाठिंबा दिला आहे. पण, शिवसेनेनं दुसरी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मुंबई विद्यापीठातील बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रात मुंबई न्युज फोटोग्राफर संघटनेनं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चित्र आणि चरित्राचे दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन भरवले आहे. हे प्रदर्शन पहाण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत आले होते.यावेळी बोलत असताना राज्यसभा निवडणुकीबद्दल संभाजीराजेंच्या भूमिकेवर राऊत स्पष्टपणे बोलले.
छत्रपती संभाजीराजे यांचा आदर आहे. शिवसेनेने ही जागा का लढवू नये. त्या जागेवर कोणाची मालकी नाही. संभाजीराजे हे आदरणीय आहेत ते निवडणुकीत उतरले आहेत याचा अर्थ त्यांनी 42 मतं जमवली असतील. आमच्याकडे ही अधिक मते नाहीत त्याची जुळवाजुळव करावी लागते. खासदारकीच्या निवडणुकीत आम्ही घोडेबाजार होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.
(रसाळ गोड आंब्यामुळे ओठांवर आणि आजूबाजूला फोड का येतात?)
'बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीने मी नेहमी भावुक होतो. बकसाहेबांनी माझा हात पकडला नसता तर हा संजय राऊत दिसला नसता. त्यांना जसा हवा होता तसा संजय राऊत घडवला.बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलं. विश्वासघात करायचा नाही,पाठीत खंजीर खुसायचा नाही हे बाळासाहेबांनी शिकवले', असं म्हणत राऊत यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
'शरद पवार आणि बाळासाहेब यांची मैत्री हे पडलेले कोडे असायचे. एकमेकांवर राजकीय टीका मात्र मैत्री कायम आहे. राज ठाकरे यांना मी आमंत्रण देतो त्यांनी हे छायाप्रदर्शन पाहायला यावे', असं निमंत्रणही राऊत यांनी राज ठाकरेंना दिलं.
संजय राऊत २६ मे रोजी भरणार अर्ज
दरम्यान, संजय राऊत यांना पुन्हा एकदा शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे. संजय राऊत येत्या २६ मे रोजी विधानभवनात जाऊन राज्य सभेसाठी शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहे. शिवसेना नेते म्हणून सलग चौथ्यांदा संजय राऊत राज्यसभेवर जाणार आहे. संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. सत्ता स्थापन करण्याच्या नाट्यात संजय राऊत यांनी भाजपला अंगावर घेतले होते.शिवसेनेची रोखठोक भूमिका मांडून राऊत यांनी भाजपच्या नाकीनऊ आणले होते. याचेच बक्षीस म्हणून राऊत यांच्या गळयात पुन्हा एकदा राज्यसभेच्या खासदाराची माळ पडली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.