मुंबई, 09 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध शिवसेना वाद चांगलाच पेटला आहे. भाजपने कंगनाची बाजू घेतल्यानंतर आज शिवसेनेनं भाजपवर विखारी टीका केली आहे. 'राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे ही सुद्धा ‘हरामखोरीच’ म्हणजे मातीशी बेइमानीच आहे.' असा शब्दात शिवसेनेनं भाजपवर सडकून टीका केली आहे.
पावसाळी अधिवेशनात भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत आणि कंगना रानावत प्रकरणावरून शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. या टीकेला आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे.
झेंडा लावला म्हणून पेटला वाद, पोलिसांची कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण, VIDEO
'शिवसेनेने वेगळी वाट निवडली असली तरी ‘पंतप्रधान’ म्हणून मोदींचा अवमान कदापि सहन करणार नाही. मोदी हे आज एक व्यक्ती नसून पंतप्रधान म्हणून ‘संस्था’ आहे. महाराष्ट्रातील बेइमानांच्या पाठीशी जे उभे राहात आहेत, त्यांना 106 हुतात्म्यांचे तळतळाट लागतीलच, पण राज्याची 11 कोटी जनताही माफ करणार नाही. ‘मुंबाई’ मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. बेइमान लेकाचे! या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये' अशा शब्दात शिवसेनेनं फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
'मुंबईत इमानाने राहणाऱ्या सर्वांची आहे. मुंबईची तुलना ‘पाकव्याप्त’ कश्मीरशी करणे व मुंबई पोलिसांना माफिया वगैरे हिणवून खाकी वर्दीचा अवमान करणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. महाराष्ट्रातील 11 कोटी मऱ्हाटी जनतेस तर हा असा मुंबईचा अवमान म्हणजे देशद्रोहासारखा गुन्हा वाटतो, पण असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीच्या मागे राष्ट्रभक्त मोदी सरकारचे गृहमंत्रालय सुरक्षा कवच घेऊन ठामपणे उभे राहते तेव्हा आपले 106 हुतात्मेही स्वर्गात अश्रू ढाळत असतील' असं परखड मत सेनेनं व्यक्त केले.
शिवभक्तांनी पहिली लढाई जिंकली, अखेर संभाजी बिडी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल
'भारतीय जनता पक्ष मुंबईचा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचाअवमान करणाऱ्यांना सरळ पाठिंबा देत आहे. हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा, धर्माचा आणि 106 हुतात्म्यांच्या त्यागाचाच अवमान केला व असा अवमान करून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रावर नशेच्या पिचकाऱ्या टाकणाऱ्या व्यक्तीला केंद्र सरकार विशेष सुरक्षेच्या पालखीचा मान देत आहे. मुंबईला आधी बदनाम करायचे, नंतर खिळखिळे करायचे. मुंबईस संपूर्ण कंगाल करून एक दिवस ती महाराष्ट्रापासून तोडायची या कारस्थानाची पावले नव्याने पडू लागली आहेत हे आता स्पष्ट दिसत आहे' असा आरोपही शिवसेनेनं थेट भाजपवर केला आहे.
आणखी एका टीव्ही अभिनेत्रीने संपवले जीवन, गळफास घेऊन केली आत्महत्या
'अहमदाबाद, गुरगाव, लखनौ, वाराणसी, रांची, हैदराबाद, बंगळुरू, भोपाळ अशा शहरांबद्दल अवमानजनक विधान एखाद्याने केले असते तर केंद्राने ‘वाय सुरक्षे’ची पालखी त्या व्यक्तीस दिली असती काय, हे महाराष्ट्रातील भाजपच्या मंडळींनी स्पष्ट करावे', असा सवालही सेनेनं विचारला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.