मुंबई, 09 सप्टेंबर : मनोरंजन विश्वामध्ये 2020 या सालात आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. 'मनसू ममता' या तेलुगू मालिकेतील अभिनेत्री श्रावणी हिने आत्महत्या करून तिचे जीवन संपवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अयशस्वी प्रेमप्रकरणातून तिने आत्महत्या केलाचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारी रात्री तिने तिच्या एस्सार नगरमध्ये असणाऱ्या मथुरा नगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री सुमारे 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास अभिनेत्रीने हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान तिच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी देवराजा रेड्डी नावाच्या व्यक्तीवर काही आरोप केले आहेत. तो काही दिवसांपासून तिला त्रास देत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याला शिक्षा व्हावी अशी मागणी श्रावणीच्या भावाने केली आहे. एस्सार नगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. टीव्ही9 तेलुगूने यासंदर्भात वृत्त दिले आहे. Osmania हॉस्पीटलमध्ये तिचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी नेण्यात आला आहे.
(हे वाचा-एकता कपूरने मागितली माफी, अहिल्याबाईंचे नाव वापरून भावना दुखावल्याचा आरोप)
श्रावणीने मनसू ममता आणि मौनारागम सीरियलमध्ये अशा काही प्रसिद्ध मालिंकांमध्ये काम केले आहे. ती गेली 8 वर्षे मालिकांमध्ये काम करत होती. श्रावणीच्या आत्महत्येमागील ठोस कारण काय असावे, याबाबत शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडून सर्वतोपरी शोध सुरू आहे. पोलीस अद्याप निष्कर्षापर्यंत पोहोचले नाही आहे. संशयास्पद मृत्यू अशी या घटनेची नोंद करण्यात आली असून पोस्टमार्टम अहवालाच्या आधारे पुढील चौकशी केली जाणार आहे.
(हे वाचा-कंगनासाठी गुंडांचा उच्छाद, हिमाचल प्रदेशमधून गृहमंत्र्यांना फोन करून दिली धमकी)
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण मनोरंजन विश्व हादरले होते. त्याचे पडसाद अद्यापही संपूर्ण इंडस्ट्रीवर दिसून येत आहेत आणि याप्रकरणी रोज नव्या घटना देखील घडत आहेत. काही दिवसांनी 'खुलता कळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आणि नवोदित कलाकार आशुतोष भाकरे याने नांदेड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. काही दिवसांनी राजस्थानमधील अलवर या शहरातून पुढे आलेली गायिका रेणू नागरच्या बॉयफ्रेंडने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले होते.