...आता तुम्ही दिल्लीत आहात, तुम्हालाच प्रतिकार करावा लागेल, शिवसेनेचा मोदींना टोला

...आता तुम्ही दिल्लीत आहात, तुम्हालाच प्रतिकार करावा लागेल, शिवसेनेचा मोदींना टोला

'मोदी पंतप्रधान झाल्यापासून देश अधिक मजबूत, खंबीर व लढाऊ बाण्याचा झाला, असे दावे सहा वर्षांत अनेकदा झाले, पण या काळात पाकिस्तान, नेपाळ व आता चीनने हिंदुस्थानवर सरळ हल्ला केला आहे.

  • Share this:

मुंबई, 18 जून : भारत आणि चीन सीमेवर झालेल्या वादाचे देशभरात पडसाद उमटले आहे. 'लडाखच्या हिंदुस्थानी हद्दीत घुसून चीनने जो हल्ला केला तो एक इशारा आहे.तणाव कोणालाच नको आहे. सध्याच्या काळात तो कोणालाच परवडणारा नाही, पण 20 जवानांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे काय? प्रतिकार झालाच नाही तर मोदी यांच्या प्रतिमेस त्यामुळे धक्का बसेल' अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आला आहे.

'हिंदुस्थान व चीनच्या सैनिकांमध्ये सोमवारी युद्ध झाले. हे युद्ध रक्तरंजित आहे. त्यात हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाल्याचे वृत्त संतापजनक आहे, पण हे युद्ध नसून दोन देशांच्या सैन्यांत हाणामारी झाली असे सांगण्यात येत आहे.  सीमेवर रक्ताचे सडे पडत आहेत. हिंदुस्थान-चीन सीमेवर हा संघर्ष व चढाया पन्नास वर्षांनंतर सुरू झाल्या व 20 जवानांच्या हौतात्म्यानंतरही देशाचे पंतप्रधान काय झाले ते सांगण्यासाठी जनतेसमोर येऊ नयेत हे धक्कादायक आहे असून अधिकृतपणे सांगायला बुधवार उजाडावा लागला' अशी टीका सेनेनं केली.

संरक्षण उत्पादने, अणुबॉम्ब बनवायचे कशाला?

'आता चीनचे सैनिकही मारले गेले यावर खूश होऊनच आपण टाळ्या वाजवायच्या काय? चीनचेही नुकसान झाले हे मान्य, पण हिंदुस्थानच्या हद्दीत चिनी सैन्य घुसले आहे हे सत्य असेल तर चीनने हिंदुत्वाच्या सार्वभौमत्वावर हा घाला घातला आहे. याआधी 1975 मध्ये चिनी सैन्य आपल्या अरुणाचल प्रदेशात घुसले होते व त्यांनी गोळीबार केला होता. त्यात चार हिंदुस्थानी सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर ही आता सगळ्यात भयंकर दंगल सीमेवर झाली आहे. कोणतेही हत्यार, बंदुका, क्षेपणास्त्रे, रणगाडे न चालवता दोन्ही बाजूंनी इतकी प्रचंड सैन्यहानी होत असेल तर मग संरक्षण उत्पादने, अणुबॉम्ब बनवायचे कशाला? असा सवालही सेनेनं उपस्थितीत केला.

 चीन तर एक फसवा आणि मायावी देश

'मोदी पंतप्रधान झाल्यापासून देश अधिक मजबूत, खंबीर व लढाऊ बाण्याचा झाला, असे दावे सहा वर्षांत अनेकदा झाले, पण या काळात पाकिस्तान, नेपाळ व आता चीनने हिंदुस्थानवर सरळ हल्ला केला आहे. हिंदुस्थानच्या सीमेवरील एकाही राष्ट्राशी आपले सलोख्याचे संबंध नाहीत व आपले राज्यकर्ते जग जिंकायला निघाले याचे आश्चर्य वाटते.

भारत चीन : दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची संघर्षानंतर प्रथमच फोनवर चर्चा

नेपाळने हिंदुस्थानचा नकाशा कुरतडला आहे.  पाकिस्तानची मस्ती सर्जिकल स्ट्राइकनंतरही कायम आहे. चीन तर एक फसवा आणि मायावी देश आहे, पण नेपाळही हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेनं पाहात असेल, आव्हानाची भाषा करीत असेल तर जगाचा नेता, महासत्ता वगैरे होऊ पाहणाऱ्या आपल्या देशाची अवस्था बरी नाही हे मानावे लागेल' अशी टीकाही मोदींवर करण्यात आली.

'नरेंद्र मोदी आज दिल्लीचे सर्वसत्ताधीश'

पंडित नेहरू, इंदिरा गांधी, वाजपेयी यांनी धगधगत्या सीमा शांत ठेवण्याचा प्रयत्न केला तो यासाठीच. सीमेवरील संघर्षाची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागते. चीनबरोबर जो संघर्ष आज सुरू आहे त्याचे कूळ आणि मूळ पंडित नेहरूंच्या फसलेल्या परराष्ट्र धोरणात आहे असे जाहीर सभांतून सांगितल्याने टाळ्या मिळतील, पण आज जवानांची बलिदाने सुरू आहेत ती थांबवण्याची जबाबदारी मोदी सरकारचीच आहे. ‘गडबड सीमेवर नसून दिल्लीत आहे. दिल्लीची सरकारे नामर्द आहेत म्हणून सीमेवर शत्रू अरेरावी करतो’, असे सहा वर्षांपूर्वी जोरकसपणे सांगणारे नरेंद्र मोदी आज दिल्लीचे सर्वसत्ताधीश आहेत. त्यामुळे आज जे घडले आहे त्याचा प्रतिकार मोदींनाच करावा लागेल' असा टोलाही सेनेनं लगावला.

मुलगा शहीद झाल्याच्या वृत्ताने कुटुंबावर शोककळा, दुसऱ्याच दिवशी जवानाचा आला फोन

First published: June 18, 2020, 9:49 AM IST

ताज्या बातम्या