नागपूर, 20 डिसेंबर : नागपूरमध्ये सोमवारपासून (19 डिसेंबर) हिवाळी अधिवेशनला सुरुवात झाली आहे. तब्बल दोन वर्षानंतर येथे अधिवेशन होत आहे. मात्र, याठिकाणी योग्य व्यवस्थापन होत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या जवळपास शंभरहून अधिक पोलिसांवर उपाशी राहण्याची पाळी आली. कंत्राटदाराने पाठविलेले भोजन संपल्यामुळे या पोलिसांना भोजन मिळाले नाही. तर ज्यांना भोजन मिळाले त्या पोलिसांनी हे भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार केली आहे. तर आज सभागृहात कामकाज चालू असतानाच विज गेल्याचा फटका खुद्द उर्जामंत्र्यांनाच बसला आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला टोला लगावला आहे.
वीज गेल्यावर कशी अडचण होते, हे आज संपूर्ण सभागृहाला प्रत्यक्ष अनुभवता आलं. खुद्द ऊर्जामंत्री बोलत असतानाच वीज गेल्याने बल्ब, माईक बंद पडून कामकाजही बंद पडलं..
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 20, 2022
आपल्या बळीराजाला व छोट्या उद्योगांना तर मिनिटामिनिटाला विजेसाठी झुंजावं लागतं! यानिमित्त तरी सरकार त्याची दखल घेईल का?
सभागृहात काय घडलं? नागपूरमध्ये तब्बल दोन वर्षानंतर पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशन होत आहे. यासाठी सरकारने जोरदार तयारी केल्याचा दावा सत्ताधारी करत आहेत. मात्र, आज या अव्यवस्थेचा फटका खुद्द उर्जामंत्री यांना बसला आहे. कामकाज चालू असताना अचनाक वीज गेल्याने सभागृहातील सर्व बल्ब, माईक बंद झाले. यामुळे कामकाज काहीवेळासाठी ठप्प झाले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारला टोला लगावला आहे. “वीज गेल्यावर कशी अडचण होते, हे आज संपूर्ण सभागृहाला प्रत्यक्ष अनुभवता आलं. खुद्द ऊर्जामंत्री बोलत असतानाच वीज गेल्याने बल्ब, माईक बंद पडून कामकाजही बंद पडलं. आपल्या बळीराजाला व छोट्या उद्योगांना तर मिनिटामिनिटाला विजेसाठी झुंजावं लागतं! यानिमित्त तरी सरकार त्याची दखल घेईल का?” असा प्रश्न रोहीत पवार यांनी उपस्थित केला आहे. वाचा - मुख्यमंत्री शिंदेंवर भुखंडाचे श्रीखंड लाटण्याचा आरोप, विरोधकांनी केली राजीनाम्याची मागणी पहिल्या दिवशी पोलीस उपाशी हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी विविध जिल्ह्यांतून पोलिसांना उपराजधानीत तैनात करण्यात आले आहे. यात टेकडी मार्ग आणि मॉरेस कॉलेज टी पॉईंट येथे विधानभवनावर काढण्यात येणारे मोर्चे अडविण्यात येत आहेत. या दोन्ही ठिकाणी जवळपास 300 पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी या पोलिसांसाठी भोजन आले. मात्र शंभरच्या वर पोलिसांचे भोजन राहिले असताना भोजन संपले. भोजन संपल्यामुळे पोलिसांचा नाईलाज झाला. त्यांना दुपारी चार वाजेपर्यंत दुसरे भोजन येणार असल्याचे सांगण्यात आले. हिवाळी अधिवेशनासाठी आपले घरदार, शहर सोडून आलेल्या पोलिसांवर संबंधित कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे उपाशी राहण्याची वेळ आली.