मुंबई, 29 जानेवारी : आपल्या कथित चमत्काराच्या दाव्यामुळे अडचणीत आलेले बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री आता नव्या वादात अडकले आहेत. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, अशी मुक्ताफळे बागेश्वर बाबांनी उधळली आहे. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी बाबांवरुन थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. त्याचवेळी अशी गरळ ओकणाऱ्यांना तुकोबारायांच्याच शब्दांत उत्तर द्यावं, असं सांगत अभंगाच्या दोन ओळी ट्विटरवर शेअर केल्या आहेत.
असं वक्तव्य महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही : रोहीत पवार
"बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडं आहे ते मात्र शांत आहेत", असे म्हणत रोहीत पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. "या बाबाची बडबड एकवेळ मध्यप्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेलं महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही", अशा इशारा देत अशा माणसाला सरकारने तुकोबारायांच्याच शब्दांत उत्तर द्यावं… "तुका म्हणे ऐशा नरा, मोजूनी माराव्या पैजरा!" असं ट्विट केलं आहे.
बागेश्वर बाबा काय म्हणाले?
“संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारलं, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, अरे वा… प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. भक्तीत लीन झालो नसतो. पत्नीच्या प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्याने देव मला त्याची सेवा करण्याची संधी तर देतो. प्रभू रामाच्या चरणी लीन होण्याची संधी तर देतोय….”
बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडं आहे ते मात्र शांत आहेत.. या बाबाची बडबड एकवेळ मध्यप्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेलं महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही. pic.twitter.com/VfZ7E0FeBk
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 29, 2023
बागेश्वर महाराज आम्ही तुम्हाला माफ करतो : देहू संस्थान
देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी संस्थानची भूमिका मांडली आहे. "तुकोबांना घास भरवल्याशिवाय त्या अन्न, पाणी घेत नव्हत्या. डोंगराच्या ठिकाणी नामस्मरणात असलेल्या तुकोबांना त्या भाकरी खाऊ घालून यायच्या. पतीव्रतेची त्यामागची भूमिका त्यांची होती. त्यामुळे त्यांच्यावर चुकीचे वक्तव्य करू नयेत. अगोदर सविस्तर माहिती घ्यावी मगच बोलावे. वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे. बंबाजी, रामेश्वर भट्ट यांना माफ करणारा आहे. बागेश्वर महाराज आम्ही तुम्हाला माफ करतो. क्षमा करणे हा वारकऱ्यांचा सर्वात मोठा गुण आहे. संतावर चुकीचे वक्तव्ये करू नयेत. महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांना आवाहन करतो की यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. संतावर कोणी काही बोलू नये म्हणून कायदा बनवावा. जेणेकरून अशा गोष्टीना पायबंद बसेल." असे माणिक महाराज मोरे म्हटले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Rohit pawar