चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे, 29 जानेवारी : आधी आपल्या चमत्काराच्या दाव्यामुळे अडचणीत आलेले बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री आता नव्या वादात अडकले आहेत. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, अशी मुक्ताफळे धीरेंद्र शास्त्री यांनी उधळली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांना 'शिंदेशाही' पगडी वरुन इशारा दिला आहे.
भोंदू बागेश्वर धामचे बाबा 'शिंदेशाही पगडी' काढा : संतोष शिंदे
धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा संभाजी ब्रिग्रेडचे नेते संतोष शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. शिंदे म्हणाले, "जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची बदनामी करणारे बागेश्वर धाम नावाचा भोंदू बाबा तु पहिली शिंदेशाही पगडी काढ, तुझी पात्रता नाही शिंदेशाही, होळकरशाही पगडी घालायची. ही स्वराज्याच्या मावळ्यांची पगडी आहे. शिंदेशाही, होळकर शाही'ची पगडी घालून चमत्कार करणाऱ्याला, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची बदनामी करणाऱ्याला संभाजी ब्रिगेड सोडणार नाही", असा थेट इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. वारकरी, स्वयंघोषित पक्षाच्या अध्यात्मिक आघाड्या झोपल्या की काय? असा प्रश्न देखील संतोष शिंदे यांनी विचारला आहे.
वाचा - Dhirendra Shastriच्या 'जादू'चं सत्य काय? देवघरचे पुरोहित म्हणतात, सर्वात मोठा चमत्कारी बाबा इथे
बागेश्वर महाराज आम्ही तुम्हाला माफ करतो : देहू संस्थान
देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी संस्थानची भूमिका मांडली आहे. "तुकोबांना घास भरवल्याशिवाय त्या अन्न, पाणी घेत नव्हत्या. डोंगराच्या ठिकाणी नामस्मरणात असलेल्या तुकोबांना त्या भाकरी खाऊ घालून यायच्या. पतीव्रतेची त्यामागची भूमिका त्यांची होती. त्यामुळे त्यांच्यावर चुकीचे वक्तव्य करू नयेत. अगोदर सविस्तर माहिती घ्यावी मगच बोलावे. वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे. बंबाजी, रामेश्वर भट्ट यांना माफ करणारा आहे. बागेश्वर महाराज आम्ही तुम्हाला माफ करतो. क्षमा करणे हा वारकऱ्यांचा सर्वात मोठा गुण आहे. संतावर चुकीचे वक्तव्ये करू नयेत. महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांना आवाहन करतो की यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. संतावर कोणी काही बोलू नये म्हणून कायदा बनवावा. जेणेकरून अशा गोष्टीना पायबंद बसेल." असे माणिक महाराज मोरे म्हटले.
बागेश्वर बाबा काय म्हणाले?
“संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारलं, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, अरे वा… प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. भक्तीत लीन झालो नसतो. पत्नीच्या प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्याने देव मला त्याची सेवा करण्याची संधी तर देतो. प्रभू रामाच्या चरणी लीन होण्याची संधी तर देतोय”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Religion