मुंबई, 9 जुलै : शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले संजय राठोड यांना क्लिन चिट मिळाल्याचं स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं होतं की, संजय राठोड यांना नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात घेणार का? यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी क्लिन चिट दिलं आहे.
मात्र त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार की, नाही याबाबत मुख्यमंत्र्यांनी अद्याप काहीच संकेत दिलेले नाहीत. दरम्यान आज दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Expansion) चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच माहिती दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार आषाढी एकादशी नंतर होणार असल्याची माहिती एकनाथ शिंदेनी दिली आहे. उद्या आषाढी एकादशी झाली की मी आणि देवेंद्र फडणवीस मुंबईत भेटून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करु. त्यानंतर आपल्या मनातील प्रश्नाचं उत्तर लवकरच देऊ. अधिवेशनाआधी मंत्र्यांचा शपथविधी होईल, असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
काय आहे पूजा चव्हाण प्रकरण?
7 फेब्रुवारी 2021 ला पूजा चव्हाणनं पुण्यात राहत्या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आलं होतं. या प्रकरणानंतर संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 28 फेब्रुवारीला संजय राठोड यांनी राजीनामा दिला. पूजा चव्हाण आत्महत्येचा पुणे पोलीस तपास करत आहेत. दरम्यान आता पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले होते. या पुराव्यात फोन रेकॉर्डिंग असून फोनवर बोलणारा व्यक्ती संजय राठोड असल्याचं सांगितलं जात आहे. फोनवरील संपूर्ण संभाषण बंजारा भाषेत आहे. आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं. हे कॉल पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या पाच-सहा दिवसांपूर्वीचे असल्याचा पुरावा पोलिसांना मिळाला आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'ने यासंदर्भातील वृत्त दिलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Sanjay rathod, Shivsena