मुंबई, 25 मे : लॉकडाउनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मुळगावी सोडण्यावरून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध रेल्वे मंत्री आणि योगी आदित्यनाथ असा सामना रंगला आहे. या वादात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. 'यापुढे उत्तर प्रदेशमधील मजुरांना आमची, पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय महाराष्ट्रात येता येणार नाही' असा इशाराच राज यांनी दिला.
योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करून राज्य सरकारला गंभीर इशारा दिला होता. त्यांच्या ट्वीटचा समाचार घेत राज ठाकरे यांनी जशास तसे उत्तर दिले. 'उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल तर यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही, हेही आदित्यनाथ ह्यांनी लक्षात ठेवावं' असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला.
त्याचबरोबर, 'जर उत्तर प्रदेशचे कामगार असतील तर त्यांना फक्त उत्तर प्रदेशमध्येच मतदानाचा हक्क मिळेल. कारण, कायद्यानं आपल्याकडे एका मतदाराला दोन ठिकाणी मतदान करता येत नाही. याची जाणीव मुख्यमंत्री आदित्यनाथांनी ठेवावी, महाराष्ट्रानं आणि देशातल्या इतर राज्यांनीही ठेवावी', असंही राज ठाकरे म्हणाले.
तसंच, महाराष्ट्र राज्य सरकारनेही ह्या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा हा कटाक्ष महाराष्ट्रानं पाळावा' अशी मागणीही राज ठाकरेंनी केली.
पियूष गोयल विरुद्ध उद्धव ठाकरे!
दरम्यान, रेल्वे मंत्रालय मजुरांना सोडण्यासाठी महाराष्ट्रासाठी गाड्याच उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी राज्य सरकारवर पलटवार केला होता.
रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी राज्यांसाठी125 ट्रेन देण्यास तयार आहोत. मात्र, राज्य सरकारने अडकलेल्या मजुरांची यादी तात्काळ रेल्वेला पाठवण्याचं आवाहन केलं होतं. रेल्वेमंत्र्यांनी याबाबत 3 ट्वीट केले. रात्री 12 वाजता पुन्हा ट्वीट केलं. 'रात्रीचे 12 वाजले आहेत आणि 5 तासांनंतरही आमच्याकडे महाराष्ट्र सरकारकडून 125 ट्रेन्स आणि प्रवाशांची यादी आली नाही. मी रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रतिक्षा करा आणि तयारी सुरु ठेवा असे, आदेश दिले आहेत, असं पियूष गोयल यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांचा रेल्वेमंत्र्यांना टोला
महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. पियूष गोयल यांना फक्त एक विनंती आहे की, ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचु नये म्हणजे झालं, अशा शब्दांत संजय राऊत यांना टोला लगावला आहे.