पुणे, 25 मे : 'पुणे तिथे काय उणे' असं उगाच म्हटलं जात नाही. पुणेकर कुठल्या गोष्टीवर कसा तोडगा काढतील याचा नेम नाही. एकीकडे पुण्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तर अशाही परिस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांनी कोविड सेंटरवरच दारूच्या बाटल्या मागवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुण्यातील मिकमार कोविड सेंटरमध्ये हा प्रकार घडला आहे. नानापेठेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. या रुग्णांना मिकमार कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. या रुग्णांसाठी त्यांच्या घरून जेवनाचा डबा येत असतो.
हेही वाचा -मोठी बातमी! कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी महाराष्ट्राने मागितली केरळकडे मदत
आज सकाळी नानापेठेतील काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे जेवणाचे डबे आले होते. पोलिसांनी या डब्याची तपासणी केली असता आत चार दारूच्या बाटल्या आणि पत्याचा कॅट आढळून आला. जेवणाच्या डब्यासोबत दारूच्या बाटल्या पाहून पोलीस आणि पालिका प्रशासनही हादरून गेलं.
पोलिसांनी ज्या तरुणाने हा डबा आणला होता, त्याला चांगलाच काठीने प्रसाद देऊन आल्या पावली परत पाठवून दिले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा कोविड सेंटरमध्येच दारू पार्टीचा डाव होता. पण, गेटवर तपासणीमुळे हा डाव पोलिसांनी उधळून लावला.
हेही वाचा -तरुणीने आत्महत्येसाठी इन्स्टाग्रामवर टाकली पोस्ट,मुंबईत सायबर सेलने पाहिली आणि..
धक्कादायक म्हणजे, पुण्यात मुंबई पाठोपाठ सर्वाधिक रुग्ण संख्या आढळून आली आहे. त्यामुळे प्रशासन रुग्ण बरे व्हावे म्हणून याची संपूर्ण काळजी घेत आहे. परंतु, दुसरीकडे काही कोविड बहाद्दरांच्या प्रतापांमुळे पालिका प्रशासन हतबल झाले आहे.
संपादन - सचिन साळवे