मुंबई, 7 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर निर्बंध लादले आहेत. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांना आर्थिक फटका बसणार असल्याने या निर्बंधांना विरोध होत आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही (MNS) पुन्हा एकदा कडक निर्बंधांवरून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ‘अर्थचक्र आणि निर्बंध याचा समतोल राखला गेला नाही तर जनता रस्त्यावर उतरेल, हे आम्ही आधीच सांगितलं होतं. दंडुकेशहीच्या जोरावर लोकशाही चालू शकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही सरकारने सुधारणा करावी, अन्यथा…’, असं ट्वीट करत मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सरकारला इशारा दिला आहे.
अर्थ चक्र आणि निर्बंध याचा समतोल राखला गेला नाही तर जनता रस्त्यावर उतरेल हे आम्ही आधीच सांगितलं होतं. दंडुकेशहीच्या जोरावर लोकशाही चालू शकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही सरकारने सुधारणा करावी अन्यथा.....
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 7, 2021
दरम्यान, निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली होती. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश होता. या चर्चेनंतर राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विशेष आवाहन करत सरकारने घेतलेल्या निर्णयाला सहकार्य करावं, असं म्हटलं होतं. मात्र राज्य सरकारने अधिकच कठोर निर्बंध लादल्याचं सांगत आता मनसेनं पुन्हा एकदा सरकारवर टीका करत निर्णयामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. हेही वाचा - राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर शिवसेनेचं आक्रमक रूप, भाजपवर केले गंभीर आरोप दुसरीकडे, भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही कडक निर्बंधांवरून सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. ‘कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात अस्वस्थता आहे. त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा देण्याबाबत, तसेच सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करावी,’ अशी मागणी करणारं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.