मुंबई, 03 जुलै : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने मंगळवारी सकाळी पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. पण या दरम्यान आपल्या हुशारीने ट्रेन वेळेवर थांबवून मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी हजारो प्रवाशांचे जीव वाचवले आहेत. सकाळची वेळ असल्यामुळे रेल्वेमध्ये खूप गर्दी होती. त्यामुळे चंद्रशेअर यांच्या प्रसंगवाधाने मोठी जीवितहानी टळला असं म्हणायला हरकत नाही. न्यूज 18शी त्यांनी बातचीत केली आणि अपघाताचा संपूर्ण प्रसंग सांगितला.
न्यूज 18लाशी बोलताना चंद्रशेखर सांवत म्हणाले की, 'मी पाहिलं, माझ्यासमोर पुलाचा एक भाग खाली कोसळत होता. केवळ 5 ते 7 सेकंदातच ट्रेन त्या ढिगाऱ्याखाली पोहचत होती. त्यामुळे सगळ्यात आधी मी अर्जंट ब्रेक लावला. या सगळ्याबद्दल माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं. सकाळी वेळ म्हणजे प्रवाशांची कामावर जायची वेळ होती. त्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी होती. पण मी अर्जंट ब्रेक दाबल्याने मोठा अपघात टळला.'
या अपघाताचा सगळ्यात मोठा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. नडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. काम युद्धपातळीवर सुरू आहे. या सगळ्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे, त्यामुळे घरी किंवा ऑफिसमध्ये जाण्यासाठी तुम्ही या मार्गांचा वापर करू शकतो.
- पश्चिम द्रुतगती मार्ग आणि एसवी रोडवर ट्राफिक असल्यानं ठाण्याला उतरून घोडबंदर रोडवरून बोरिवलीकडे जाता येईल.
- तिथून डाऊनला विरारकडे जाऊ शकता
- हार्बर मार्गावरील प्रवासी आज मध्य रेल्वेवरुन प्रवास करु शकतात.
- अन्यथा सीएसटीवरून चर्चगेटला जाऊन डाऊनला जाता येईल.
- मध्यरेल्वेवरून पश्चिम रेल्वेवर जाणाऱ्यांसाठी घाटकोपर मेट्रो हा पर्याय आहे.
- प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टतर्फे रेल्वेस्थानकांवरून जास्तीच्या बसेस सोडण्यात येणार
- बेस्टनं बोरिवली ते चर्चगेट दरम्यान अतिरिक्त बसेस सोडल्या
- अंधेरी स्थानकावरून विविध मार्गांवर बेस्टच्या बसेस सोडण्यात येणार आहेत.
- गर्दी नियंत्रण व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली असल्याचीही माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.
- अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन मध्य रेल्वेनं केलं आहे.