मुंबई, 13 एप्रिल : गुन्हेगार कितीही सराईत, चतुर किंवा हुशार असला तरीही तो काहीतरी पुरावा सोडून जातोच असं म्हटलं जातं. शिवाय पोलिसही या पुराव्यापर्यंत पोहोचतात आणि गुन्हेगाराच्या मुसक्या आवळतात. सचिन वाझे प्रकरणात तर वाझे स्वत: पोलिस असूनही त्यानं पुरावा सोडण्याची चूक केली. त्याचा मागोवा घेत तपास यंत्रणांनी बरंच काही पितळ उघडं पाडलंय. गाडीवरच्या एका स्टिकरनं (one stocker solved mystery of Sachin Vaze) बरंच काही समोर आणल्याचं या प्रकरणात पाहायला मिळालं आहे. (वाचा - चहावाला ते पंतप्रधान; मोंदीच्या प्रवासामुळे भारावलेली चहावाली निवडणूक रिंगणात ) सचिन वाझेचं पांढऱ्या गाडीबरोबरचं आणखी एक CCTV फुटेज समोर आलं आहे. सचिन वाझे हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ कार मायकल रोडवर पार्क करुन परत ठाण्याला गेला होता, आणि पुन्हा गाडीची नंबर प्लेट बदलून स्वत:चा पेहराव बदलून पुन्हा मुलूंड टोल नाक्यावरुन मुंबईच्या दिशेने गेला होता. त्यावेळचे हे सीसीटिव्ही फुटेज आहे. साधारणपणे पहाटे 4 वाजून 2 मिनिटांनी सचिन वाझे पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीतून ठाण्याहून मुंबईच्या दिशेला गेला होता. त्यावेळी गाडी मुलूंड टोल नाक्यावरील CCTV फुटेज मध्ये दिसली होती. 25 फेब्रुवारीच्या रात्री हे सर्व घडलं. सचिन वाझेने किती वेळा आणि कुठून कसा प्रवास केला हे पाहुयात.. काय घडले 25 फेब्रुवारीच्या रात्री - ठाण्याहून पांढऱ्या रंगाची इनोव्हा 1 वाजून 20 मिनिटांनी मुलुंड टोलनाक्यावरुन मुंबईच्या दिशेने जाताना दिसत आहे. त्यावेळी इनोव्हाचा नंबर होता MH04AN**** - या नंतर मुंबईतील प्रियदर्शनी पार्कमध्ये आधीच उभ्या असलेल्या हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओजवळ ही इनोव्हा जाते. - नंतर दोन्ही गाड्या एकत्र मुंबईच्या दिशेने रवाना होतात. दोन्ही गाड्या 2 वाजून 18 मिनिटांच्या सुमारास कार मायकल रोडवर पोहोचतात - हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतील ड्रायव्हर पांढ-या रंगाच्या गाडीत बसतो - साधारण 3 वाजून 05 मिनिटांच्या सुमारास पांढऱ्या रंगांची इनोव्हा मुलुंड टोलनाक्याहून ठाण्याच्या दिशेने जाते तेव्हाही नंबर तोच MH 04 AN **** होता. - यानंतर गाडीची नंबर प्लेट बदलून ओळख लपवण्यासाठी पांढ-या रंगांचा कुर्ता आणि फेस शिल्ड घालून तीच इनोव्हा घेवून चालक पहाटे 4 वाजून 3 मिनिटांनी मुलूंड टोल नाक्यावरुन मुंबईला जाताना दिसतो. पण या वेळी गाडीचा नंबर होता MH01AZ*** - यानंतर ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा जवळपास 4 वाजून 35 मिनिटांच्या आसपास कार मायकल रोडवर हिरव्या रंगाच्या गाडीजवळ पोहोचली - नंतर हीच पांढऱ्या रंगाची गाडी 5 वाजून 18 मिनिटांनी मुलूंड टोल नाक्यावरुन ठाण्याच्या दिशेने जाताना दिसते. (वाचा - BREAKING : ‘अनिल देशमुख हाजीर हो’, अखेर सीबीआयने बोलावलं चौकशीला! ) या वर्णनावरून नंबर प्लेट बदलल्या तरी तपास यंत्रणांना गाडीची ओळख कशी पटली हा प्रश्न उभा राहतो. त्याचं उत्तर NIA सुत्रांनी दिलेल्या माहितीतून समोर येतं. त्यानुसार MH04AZ*** या गाडीच्या मागच्या नंबरप्लेट खाली एक स्टीकर लावलेलं होतं… डेंट लपवण्यासाठी असं स्टीकर लावलं जातं. गाडीचा नंबर MH01AZ*** झाला तेव्हाही गाडीच्या मागच्या नंबर प्लेट खाली एक स्टिकर होतं. त्यावरुनच मुलूंड टोलनाक्यावरील सीसीटिव्हीत कैद झालेल्या गाड्या दोन नव्हत्या तर एकच गाडी होती यावर NIA चा विश्वास पटला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.