मुंबई, 21 जून : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत खळबळ उडाली आहे. आजचा संपूर्ण दिवस एकनाथ शिंदे, त्यांनी केलेला बंड आणि आघाडी सरकारवर लटकणारी तलवार या भोवती फिरताना दिसून आलं. एकनाथ शिंदे यांनी बंड मागे घेतलं नाही तर आघाडी सरकार कोसळेल आणि भाजप सत्ता स्थापना करू शकेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद (Uddhav Thackeray) देण्यावरुन डावललं गेल्याचंही म्हटलं जात. मात्र जर भाजपची सत्ता आली तर मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीसांना मिळू शकतं. जर तसं झालं तर भाजपमध्ये पुन्हा मुख्यमंत्रिपदाची चुरस सुरू होऊ शकते. बीडमधील आष्टी येथील भाजपा कार्यकर्त्या मेळाव्यात पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा, अशा घोषणा देण्यात आल्या. यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासमोर 'पंकजाताई भावी मुख्यमंत्री', 'पंकजाताईंना मुख्यमंत्री करा', अशा घोषणा दिल्या. त्यावेळी पंकजा मुंडे खळखळून हसल्या. कार्यकर्त्यांच्या अपेक्षांमुळे माझी डोकेदुखी होते, असे म्हणत त्यांनी भाषणातून कार्यकर्त्यांना मुख्यमंत्रिपदावरून प्रतिउत्तर दिले. एकीकडे आघाडी सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीसांकडून प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे बीडमध्ये मात्र कार्यकर्ता मेळाव्यात पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हाव्यात अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस विरुद्ध पंकजा मुंडे असा संघर्ष पाहायला मिळू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Pankaj munde, Shivsena