मुंबई, 09 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेमध्ये वाद पेटला आहे. या वादात आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही उडी घेतली आहे. नवनीत राणा यांनी कंगनाची बाजू घेत थेट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मुंबई पाकव्याप्त भाग आहे आणि मुंबई पोलिसांबद्दल वक्तव्य केल्यामुळे शिवसेनेनं कंगना राणावतवर सडकून टीका केली आहे. आज मुंबई महापालिकेनं कंगनाच्या ऑफिसमध्ये अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगून तोडकाम केले. या प्रकरणावर नवनीत राणा यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
कंगना Vs शिवसेना प्रकरणात नवनीत राणांची उडी, संजय राऊतांचा राजीनामा घ्या, मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी pic.twitter.com/Xh7TJ1PZbN
'राज्य सरकारने कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड केली. सत्तेत असल्यामुळे दुरुपयोग करून ही कारवाई करण्यात आली आहे. ही हुकूमशाही योग्य नाही, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.
त्यानंतर नवनीत राणा यांनी आपला मोर्चा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडे वळवला. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती हा राज्याची जबाबदारी घेऊन चालतो. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची एकतर पाठराखण करावी किंवा महिलांच्या बाजूने असाल तर त्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणीच नवनीत राणा यांनी केली.
दरम्यान, मुंबई महापालिकेनं (BMC) ऑफिसवर हातोडा मारल्यानंतर कंगना संतप्त झाली आहे. कंगनाने यानंतर आपल्या ऑफिसचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही लोकशाहीची हत्या असल्याचं कंगना म्हणाली आहे.
कंगनाने एकापाठोपाठ एक ट्वीट करून शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरदेखील निशाणा साधला आहे. मुंबई महापालिकेनं आपल्या ऑफिसची काय अवस्था केली हे कंगनाने व्हिडीओ शेअर करत दाखवलं.
ऑफिसची जेव्हा तोडफोड सुरू झाली होती तेव्हा कंगनाने हे पाकिस्तान आहे, असं म्हटलं होतं. कंगनाने शिवसेनेची तुलना थेट बाबरशीही केली आहे. कंगनाच्या ऑफिसवर तोडकाम करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी जेव्हा पोहोचले तेव्हा कंगनाने, हे बाबरची सैन्य असल्याचंही म्हटले होते.